आयएएफ आज मिग -21 ला निरोप देतो
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत होणार सोहळा : फ्लायपास्टमध्ये विमानांचा जोरदार सराव
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
62 वर्षांपासून देशाचे रक्षण करणारे प्रतिष्ठित मिग-21 लढाऊ विमान आता निवृत्त होत आहे. शुक्रवार, 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम निरोप समारंभाच्या तयारीसाठी गेल्या दोन दिवसांपासून चंदीगड हवाई दलाच्या तळावर पूर्ण ड्रेस रिहर्सल आयोजित करण्यात आली होती. या रिहर्सलमध्ये मिग-21, जग्वार आणि सूर्य किरण एरोबॅटिक टीमने एक दिमाखदार फ्लायपास्ट सादर केला. मिग-21 ने 62 वर्षांची उत्कृष्ट सेवा दिली आहे.
26 सप्टेंबर रोजी मुख्य समारंभात मिग-21 ला वॉटर कॅनन सलामी दिली जाईल. मिग ताफ्याच्या अंतिम निवृत्तीनिमित्त हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग हे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना फॉर्म-700 (विमानाची लॉगबुक) सुपूर्द करतील. मिग-21 च्या सन्मानार्थ एक विशेष ‘डे कव्हर’ देखील जारी केला जाईल. या समारंभात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सीडीएस जनरल अनिल चौहान, एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग, लष्करप्रमुख, नौदलप्रमुख यांच्यासह 6 माजी हवाई दल प्रमुख आणि शेकडो माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.
हवाई दल प्रमुख स्वत: मिग-21 उडवून निरोप देताना सदर विमान अजूनही लढाईसाठी सज्ज असल्याचे दाखवून देतील. बुधवारी झालेल्या सरावावेळी मिग-21 आणि जग्वार यांच्यातील डॉगफाइट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. जग्वारला घुसखोर म्हणून दाखवण्यात आले होते, तर मिग-21 ने कव्हर दिले होते. 2019 च्या बालाकोट हल्ल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानी एफ-16 पाडल्यानंतर दाखवलेल्या शौर्याची ही आठवण करून देणारी घटना होती.
अनेक युद्धातील ‘हिरो’
मिग-21 हे विमान 1963 मध्ये कार्यन्वित झाले. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्याने पाकिस्तानी लक्ष्ये नष्ट केली. तसेच 1971 च्या युद्धात, ढाका (तत्कालीन पूर्व पाकिस्तान) येथील गव्हर्नर हाऊसवर बॉम्बहल्ला करून भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली. 2019 च्या बालाकोट हल्ल्यानंतर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले. मिग-21 या विमानाने पाकिस्तानचे अनेक हल्ले हाणून पाडले आणि भारतीय लष्करी शक्तीचे प्रतीक बनले. सहा दशकांपूर्वी हे विमान हवाई दलात सामील झाल्यानंतर आता त्याला अंतिम निरोप दिला जात आहे. हवाई दलाने ‘मिग-21’ संबंधी एक व्हिडिओही जारी केला असून त्यात विमानाच्या विविध हालचाली किंवा कामगिरींची दखल घेण्यात आली आहे.
निरोपाची झलक देणारा व्हिडिओ प्रसिद्ध
भारतीय हवाई दलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर मिग-21 चा गौरवशाली प्रवास दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वैमानिकांच्या भावना, जुन्या फुटेज, युद्धसराव आणि मोहिमांची झलक रेकॉर्ड केली आहे. हवाई दलाने या ऐतिहासिक प्रसंगी मिग-21 शी संबंधित वैमानिकांनाही आमंत्रित केले आहे. सदर वैमानिक या क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. या निरोप समारंभात एक विशेष लढाऊ सराव देखील आयोजित केला जाणार असून त्यामध्ये मिग-21 ची लढाऊ क्षमता दाखवली जाईल. या दरम्यान, मर्यादित तांत्रिक साधनसंपत्ती असूनही या विमानाने शत्रूंच्या प्रगत विमानांना कसे पराभूत केले हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
तंत्रज्ञानातील बदलामुळे निवृत्ती
मिग-21 ने अनेक युद्धांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी, कालांतराने त्याचे तंत्रज्ञान जुने झाले आहे. 1971 पासून मिग-21 चे सुमारे 400 हवाई अपघात झाले आहेत. ज्यात 200 हून अधिक वैमानिक आणि 50 हून अधिक नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. म्हणूनच ते निवृत्त करणे आता काळाची गरज बनली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
Comments are closed.