आगामी टी 20 वर्ल्डकपचं प्रक्षेपण कोण करणार? अखेर आयसीसी आणि जिओस्टारनेच उत्तर दिलं…
नवी दिल्ली : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका यांच्याकडून आयोजित केला जाणार आहे. वर्ल्ड कपचं आयोजन फेब्रुवारी -मार्च मध्ये केलं जाईल. आयसीसीनं वर्ल्ड कपचं वेळापत्रक देखील जाहीर केलं आहे. वर्ल्ड कपला दोन महिन्यांपेक्षा कमी कालावाधी राहिलेला असताना जिओस्टारनं आर्थिक नुकसान होत असल्यानं ब्रॉडकास्ट डीलमधून बाहेर पडण्याचा निर्णय आयसीसीला कळवल्याच्या चर्चा सुरु होत्या. आयसीसीनं नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, सोनी लिव्ह सोबत चर्चा केल्याचा दावा देखील करण्यात आला. मात्र, या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. कारण, जिओस्टार आणि आयसीसीनं ब्रॉडकास्टिंग करार रद्द करण्यासंदर्भातील अफवा फेटाळल्या आहेत. भारतातील महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धांचं ब्रॉडकास्ट करण्यासाठी जिओस्टार कटिबद्ध असल्याचं सांगण्यात आलं.
ICC and JioStar Joint Statement : आयसीसी आणि जिओस्टारचं संयुक्त निवेदन
आयसीसी आणि जिओस्टारनं संयुक्त निवेदन जारी करत ब्रॉडकास्ट करार कायम असल्याचं सांगितलं आहे. आयसीसी आणि जिओस्टारनं संयुक्त पत्रक काढत मीडिया हक्क कराराबाबत माहिती दिली आहे. सध्या आयसीसी आणि जिओ स्टार संदर्भातील मीडिया हक्क कराराबाबत च्या चर्चा सुरु आहेत त्या चुकीच्य असल्याचं त्यांनी म्हटलं. आयसीसीच्या भारतातील स्पर्धांसाठी जिओस्टार मीडिया राईटस पार्टनर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. जिओस्टारनं डीलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा चुकीच्या असल्याचं सांगण्यात आलं आहे.
जिओस्टार करारातील अटींची पूर्तता करण्यास कटिबद्ध आहे. आगामी काळातील आयसीसी स्पर्धांचं विना अडथळा आणि जागतिक दर्जाचं प्रक्षेपण भारतीय दर्शकांसाठी करणार असल्याचं जिओस्टारनं म्हटलं. ज्यामध्ये 2026 च्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कपचा समावेश आहे.
आयसीसीचा महत्त्वाचा इव्हेंट म्हणजे आगामी टी 20 वर्ल्ड कप होय. जिओस्टारकडून त्याच्या प्रक्षेपणासंदर्भात नियोजन आणि तयारी सुरु असल्याचं सांगण्यात आलं. जिओ स्टार आणि आयसीसीमध्ये 2023-27 या चार वर्षांसाठी करार झाला आहे. त्यानुसार जिओस्टार आयसीसीच्या भारतात होणाऱ्या स्पर्धांचं थेट प्रक्षेपण करेल. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या महिला वनडे वर्ल्ड कपचं प्रक्षेपण देखील जिओस्टारनं केलं होतं.
दरम्यान, भारतानं जून 2024 मध्ये पार पडलेल्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यावेळी रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्यासारखे दिग्गज संघात होते. आता टीम इंडियाच्या टी 20 संघाचं नेतृत्त्व सूर्यकुमार यादव करतोय. सूर्यकुमारच्या संघाला विजेतेपद कायम ठेवण्यात यश येते का ते पाहावं लागेल.
आणखी वाचा
Comments are closed.