पीसीबीला कोट्यवधींचा फटका, ‘टीम इंडिया’मुळे फायनलचे यजमानपदही गेले

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) हे चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे आयोजक होते. मात्र, हायब्रिड मॉडेलमुळे हिंदुस्थानच्या लढती दुबईत झाल्याने ‘पीसीबी’ला मोठे नुकसान झाले. त्यातच हिंदुस्थानने अंतिम फेरी गाठल्यामुळे ती लढतही आता दुबईत होणार असल्याने पीसीबीला कोट्यवधींचा फटका बसलाय.

हायब्रिड मॉडेलमुळे हिंदुस्थानच्या गटफेरीतील तीन लढती आणि एक उपांत्य लढत दुबईत झाली. फायनलचा सामना लाहोरमध्ये होणार होता. मात्र, हिंदुस्थानने फायनलमध्ये धडक दिल्याने पीसीबीचे लाहोरमधील फायनलच्या यजमानीचे स्वप्नही भंगले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानी संघाच्या विजयाची पाटी कोरीच राहिल्याने पाकिस्तानी प्रेक्षकांनीही स्पर्धेकडे पाठ फिरविली.

‘आयसीसी’ने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला 586 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती. एकूण 15 सामन्यांची ही स्पर्धा आहे. एका सामन्यासाठी जवळपास 39 कोटी रुपयांचे बजेट होते. हिंदुस्थानच्या गटफेरीतील 3 लढती आणि एक उपांत्य लढत अशा चार लढती आधीच दुबईत झाल्याने पाकिस्तानला 156 कोटी रुपयांचा येथेच फटका बसला. आता फायनलही दुबईत होणार असल्याने आणखी 39 कोटी म्हणजेच जवळपास एकूण 195 कोटी रुपयांचा सरळ सरळ फटका ‘पीसीबी’ला बसलाय.

स्टेडियमच्या दुरुस्तीवर 5 अब्ज रुपया खर्च

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर तीन स्टेडियमच्या नूतनीकरणावर जवळपास 5 अब्ज रुपये खर्च केले. पाकिस्तानमध्ये तब्बल 29 वर्षांनंतर आयसीसीची स्पर्धा होत असल्याने स्टेडियमवर क्रिकेटप्रेमींची हाऊसफुल गर्दी होईल, असा पीसीबीचा अंदाज होता. मात्र, पीसीबीचे सारे फासे उलटे पडले. यजमान पाकिस्तानचा संघ एकही विजय न मिळविता गट फेरीत बाद झाला. रावळपिंडीतील दोन सामने, तर नाणेफेक न होताच रद्द करावे लागले. या दोन सामन्यांच्या तिकिटांचे पैसे पीसीबी प्रेक्षकांना परत करणार आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी पार पडल्यानंतर पीसीबीवर पैशांसाठी पुन्हा एकदा आयसीसीपुढे पदर पसरण्याची वेळ येणार आहे.

Comments are closed.