आयसीसीच्या 'या' पुरस्कारासाठी बुमराह-सॅमसनमध्ये लढत, कोण मारणार बाजी? दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचेही नाव चर्चेत

आयपीएल २०२६ च्या वातावरणात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मार्च महिन्यासाठी ‘प्लेयर ऑफ मंथ’ पुरस्काराच्या नामांकनासाठी घोषणा केली आहे. यावेळी ही स्पर्धा जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा विकेटकिपर-फलंदाज कॉनर एस्टरहुइझेन यालाही या पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे.
आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ मध्ये केलेल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर बुमराह आणि सॅमसन यांना मार्च महिन्याच्या आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचे नामांकन मिळाले आहे. तसेच कॉनरला न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत केलेल्या कामगिरीमुळे हे नामांकन मिळाले आहे.

संजू सॅमसनला २०२६ च्या टी२० विश्वचषकात प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळाला होता. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर-८ सामन्यात नाबाद ९७ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ८९ धावा केल्या होत्या. त्याने अंतिम सामन्यातही ४६ चेंडूत ८९ धावा केल्या होत्या. त्या स्पर्धेत त्याने ५ सामन्यांत खेळताना ३२१ धावा केल्या होत्या. तसेच दोनदा प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला होता. त्याच्या या कामगिरीचा परिणाम म्हणून त्याने टी२० क्रमवारीत मोठी झेप घेतली होती.

दुसरीकडे बुमराहने देखील २०२६ टी२० विश्वचषकात चांगली कामगिरी केली. तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने ८ सामन्यात १२.४२च्या सरासरीने १४ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ४ षटकात १५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्याचा इकॉनॉमी रेट ६.२१ एवढा राहिला. यामुळे तो त्या सामन्याचा सामनावीर ठरला.

दक्षिण आफ्रिकेच्या कॉनर आतापर्यंत केवळ एकच टी२० मालिका खेळली आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या ५ टी२० सामन्यांमध्ये १४५.९८ च्या स्ट्राईक रेटने २०० धावा केल्या. यामध्ये त्याने दोन अर्धशतकेही केली होती.

दक्षिण आफ्रिकेने ती टी२० मालिका ३-२ अशी जिंकली होती. कॉनरने त्यामध्ये दोनदा सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता.

Comments are closed.