INDvsENG: इतिहास बदला, फायनल खेळा! भारतासमोर मोठे आव्हान, एकाचे तरी तिसरे विजेतेपद जिंकण्याची संधी मुकणार

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आज (५ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात उपांत्य सामना खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. जेथे भारताला इतिहास बदलण्याची संधी आहे. गतविजेता भारत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे, मात्र हे म्हणावे तसे सोपे नाही. या स्पर्धेत भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी केली आहे. दोन्ही संघ तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत समोरा-समोर येत आहेत. त्यामुळे त्याची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

वानखेडे स्टेडियम अनेक महत्वाच्या सामन्यांचा साक्ष आहे. यामुळे आजच्या सामन्यात प्रेक्षकांची संख्या मोठी असून भारताला पुन्हा विश्वविजेते होण्यासाठी इतिहास बदलावा लागणार आहे. टी२० विश्वचषकाच्या इतिहासात केवळ दोनच संघ लागोपाठ अंतिम सामना खेळले आहेत, श्रीलंका आणि पाकिस्तान. मात्र यातील एकही गतविजेता संघ पुढच्या आवृत्तीच्या अंतिम सामन्यात पोहोचला नाही. या स्पर्धेत कोणत्याही संघाने कधीही सलग दोन विजेतेपदे जिंकलेली नाहीत किंवा विजयानंतर सलग अंतिम फेरीतही पोहोचलेले नाहीत. भारताला हा विक्रम करण्याची संधी आहे.

भारताने आजचा (५ मार्च) इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकला तर ते सलग दोनदा अंतिम फेरीत पोहोचणारा आणि गतविजेता म्हणून विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करणारा हा पहिला संघ ठरेल. इंग्लंडही काही कमी नाही, मागील काही वर्षांपासून त्यांची टी२० मधील कामगिरी उत्तम राहिली आहे. तसेच भारताविरुद्ध त्यांची कामगिरी चांगली राहिली असून त्यांनी नेहमी भारताला कडवे आव्हान दिले आहे. वानखेडेवरचा हा सामना मोठ्या धावसंख्येचा होण्याची शक्यता आहे.

आयसीसी नॉक-आऊट्सचमध्ये ही या दोन संघांची पाचवी भेट आहे. मागील झालेल्या ४ सामन्यात दोघांनी प्रत्येकी २-२ सामने जिंकले आहेत. वानखेडे स्टेडियमवर हे दोन संघ टी२० मध्ये तिसऱ्यांदा भिडणार आहेत. येथेही समीकरण १-१ असे आहे. यामुळे दोन्ही संघ समान असून आजचा सामना कोण जिंकणार याची चुरस असणार आहे. त्याचबरोबर दोन्ही संघांनी २-२ वेळा टी२० विश्वचषक जिंकले आहेत.

Comments are closed.