T20 WC26: न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरताच टीम इंडियाच्या नावावर होणार ‘हे’ दोन वर्ल्ड रेकॉर्ड

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना रविवारी (८ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरताच दोन विश्वविक्रम आपल्या नावावर करेल. या स्पर्धेत भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला. दुसरीकडे न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारताचा हा आयसीसी स्पर्धांच्या मर्यादित षटकातील लागोपाठ चौथा अंतिम सामना असणार आहे. त्यामुळे भारत मर्यादित षटकांच्या चेंडूचे लागोपाठ ४ अंतिम सामने खेळणारा पहिला संघ ठरेल. याआधी भारताने २०२३मध्ये वनडे विश्वचषक, २०२४मध्ये टी२० विश्वचषक आणि २०२५मध्ये चॅम्पियन ट्रॉफी यांचे अंतिम सामने खेळले आहेत.
याआधी भारताने आयसीसीच्या मर्यादित षटकांच्या चेंडूचे लागोपाठ तीन अंतिम सामने खेळले आहेत. असे २०००-२००३ मध्ये झाले होते. तेव्हा भारताने दोन चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २००३च्या वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला होता.
वेस्ट इंडिजने आयसीसीच्या मर्यादित षटकांच्या चेंडूचे लागोपाठ तीन स्पर्धांचे अंतिम सामने खेळले आहेत. त्यांनी १९७५, १९७९ आणि १९८३मध्ये वनडे विश्वचषकाचे अंतिम सामने खेळले होते. तेव्हा त्यांनी दोनदा विजेतेपद पटकावले होते.
टी२० विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा रविवारी (८ मार्च) खेळला जणारा सामना चौथा अंतिम सामना असणार आहे. त्याआधी भारताने २००७, २०१४ आणि २०२४मध्ये अंतिम सामने खेळले होते. तसेच टी२० विश्वचषकाच्या इतिहासात चार अंतिम सामने खेळणारा भारत पहिलाच देश ठरणार आहे.
भारताव्यतिरिक्त इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी प्रत्येकी तीन-तीन वेळा टी२० विश्वचषकाचे अंतिम सामने खेळले आहेत. इंग्लंडने २०१०, २०१६ आणि २०२२मध्ये अंतिम सामना खेळला. पाकिस्तानने २००७, २००९ आणि २०२२मध्ये अंतिम सामना खेळला होता. श्रीलंका २००९, २०१२ आणि २०१४मध्ये अंतिम सामन्यात खेळले.
त्याचबरोबर भारत गतविजेता म्हणून अंतिम सामन्यात खेळणारा पहिला संघ ठरला आहे. २०२४च्या टी२० विश्वचषकापर्यंत एकही गतविजेता संघ अंतिम सामन्यात खेळला नाही किंवा एकाही संघाला सलग विजेतेपद पटकावता आले नाही. काही गतविजेते संघ सुपर-८ आणि काही साखळी फेरीतूनच स्पर्धेबाहेर झाले होते.
Comments are closed.