T20 WC26: वेस्ट इंडिजची सुपर-8 मध्ये धडाक्यात एंट्री, नेपाळ झाला स्पर्धेबाहेर

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६चा २५वा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध नेपाळ यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने ९ विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. जेसन होल्डर हा प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच वेस्ट इंडिजने सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. सलग तिसऱ्या पराभवामुळे नेपाळ या स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होपने नाणेफेक जिंकला आणि नेपाळला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. नेपाळने या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात इंग्लंडला चांगलीच टक्कर दिली होती, त्यानंतर मात्र त्यांची कामगिरी घसरली. यावेळी त्यांनी २० षटकात ८ विकेट्स गमावत १३३ धावसंख्या केल्या.

नेपाळकडून दिपेंद्र सिंग ऐरी याने सर्वाधिक ५८ धावा केल्या. त्याने ४७ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याने सोमपाल कामीसोबत सातव्या विकेटसाठी ५४ धावांची (२६ चेंडू) भागीदारी केली. यावेळी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करत सुरूवातीपासूनच नेपाळला रोकून धरले होते. मॅथ्यू फोर्डने तर सामन्यातील चौथे षटक एक विकेट घेत निर्धाव टाकले. जेसन गोलंदाजीही उत्तम राहिली. त्याने ४ षटकात २७ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. अकिल हौसेन, फोर्ड, शामर जोसेफ आणि रोस्टन चेज यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने सुरूवात संथ केली. त्यांनी पॉवरप्लेमध्ये एक विकेट गमावत ४४ धावा केल्या. ब्रेंडन किंग २२ धावा करत बाद झाला. ही एकमेव विकेट नंदन यादवने घेतली. त्यानंतर मात्र शाय होप आणि शिमरन हेटमायर यांनी डाव सांभाळला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. होप ६१ धावा आणि हेटमायर ४६ धावा करत नाबाद राहिले.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.