दोन दिवसांत संपलेली पर्थ कसोटी ‘चांगली’, पण भारताची खेळपट्टी ‘खराब’, नेमकं चाललंय काय?
ICC पिच रेटिंग्स अपडेट मराठी बातम्या : कसोटी क्रिकेटमधील खेळपट्टी मूल्यांकनाबद्दलची चर्चा अलीकडच्या दिवसांत जोर पकडत आहे. अशातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) एक मोठा निर्णय घेत पर्थ स्टेडियमवरील फक्त दोन दिवस चाललेल्या अॅशेज कसोटीला ‘वेरी गुड’ म्हणजेच ‘अत्यंत उत्तम’ अशी सर्वोच्च रेटिंग दिली आहे.
दुसरीकडे, भारतात झालेल्या अलीकडच्या कसोटी सामन्यांच्या खेळपट्टीला फक्त ‘सॅटिसफॅक्टरी’ (संतोषजनक) असे दर्जा मिळाला. त्यामुळेच हा प्रश्न उठू लागला आहे, आयसीसीच्या रेटिंग प्रणालीमध्ये काही असमानता आहे का?
दोन दिवसात संपला सामना तरीही ‘वेरी गुड’
पर्थमधला सामना फक्त 847 चेंडूत संपला. ऑस्ट्रेलियातील हा दुसरा सर्वात लहान कसोटी आणि 1888 नंतरच्या अॅशेज इतिहासातील सर्वात पटकन संपलेला सामना आहे. पहिल्याच दिवशी 19 विकेट्स पडल्या. तरीही सामना रेफरी रंजन मदुगाले यांनी पिचची प्रशंसा केली आणि आयसीसीने ते खराब न ठरवता उलट “अत्यंत उत्तम” रेटिंग दिली.
मग भारतातील खेळपट्टीवर फक्त ‘संतोषजनक’ का?
याच दरम्यान भारतात वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या अहमदाबाद आणि दिल्ली कसोटीच्या खेळपट्टींना रेफरी अँडी पाइक्रॉफ्ट यांनी ‘संतोषजनक’ असे रेट केले. विशेष म्हणजे हे सामने 3 ते 5 दिवस चालले होते. म्हणजे वेळेआधी संपले नव्हते. तरीही आयसीसीच्या मूल्यांकनात भारताला उच्च रेटिंग मिळाली नाही.
ICC ची पिच रेटिंग प्रणाली काय सांगते?
आयसीसीच्या चार-स्तरीय मूल्यांकन पद्धतीनुसार—
- Very Good (अत्यंत उत्तम) — फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही समान मदत
- Good (चांगली) — खेळ संतुलित, पण थोडा झुकलेला कल
- Satisfactory (संतोषजनक) — सामान्य पिच, ज्यात सुधारणा आवश्यक
- Below Average (सरासरीपेक्षा कमी) — सामन्याच्या गुणवत्तेला हानी पोहोचवणारी पिच
दोन दिवसात सामना संपला… प्रेक्षकांचे नुकसान पण…
सामना लवकर संपल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 3–4 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलरचे नुकसान झाले. तरीही त्यांना ICC ची रेटिंग मान्यच. त्यांच्या म्हणण्यानुसार, पिचने खेळात सुंदर संतुलन दिले आणि वेगवान गोलंदाजांच्या कौशल्याने रोमांच निर्माण केला. सामना संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ म्हणाला की “दुसऱ्या दिवसापासून पिचने फलंदाजांनाही मदत केली.”
आता लक्ष्य गाबा टेस्टकडे
4 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये डे-नाईट कसोटी सुरू होणार आहे. पिच क्यूरेटर डेव सँडुर्स्की यांच्या मते, या वेळीची गाबाची पिच पाच दिवस टिकेल. 2022-23 मध्ये गाबा कसोटी फक्त दोन दिवसात संपली होती आणि त्यावेळी त्याला ‘सरासरीपेक्षा कमी’ अशी खराब रेटिंग मिळाली होती.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.