ICC ची मोठी घोषणा! 1 अब्ज रुपयांहून अधिक बक्षिसांचे वाटप; टीम इंडियावर कोटींचा पाऊस, तर पाकिस्तानला मिळाले ‘इतके’ पैसे

8 मार्च रोजी टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या विजेत्याची घोषणा झाली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. आपल्या विजेतेपदाचे रक्षण करणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला आहे. इतकेच नाही तर मायदेशात टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा देखील भारत हा पहिलाच संघ आहे. या विजयानंतर बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंसाठी 131 कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेची घोषणा केली होती, आता आयसीसीने (ICC) देखील बक्षिसाचा आकडा जाहीर केला आहे.
आयसीसीने जाहीर केल्यानुसार, या स्पर्धेसाठी एकूण 11.25 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 103.46 कोटी रुपयांचे बक्षीस खेळाडूंमध्ये विभागले जाणार आहे. भारताला विजेता संघ म्हणून सर्वाधिक 26 लाख 39 हजार 423 डॉलर्स म्हणजेच साधारण 24 कोटी 28 लाख रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या न्यूझीलंडला साधारण 13.9 कोटी रुपये मिळतील.
दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वाधिक रक्कम मिळवणाऱ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना 9 कोटी 25 लाख रुपये मिळणार आहेत. उपांत्य फेरीत भारताकडून पराभूत झालेल्या इंग्लंडला 9 कोटी रुपयांपेक्षा थोडी कमी रक्कम मिळेल. विशेष म्हणजे, पाकिस्तानचा संघ सुपर-8 च्या पुढे जाऊ शकला नसल्याने, सर्वाधिक रक्कम मिळवणाऱ्या पहिल्या 5 संघांमध्ये त्यांचा समावेश नाही. पाकिस्तानला केवळ 4 कोटी 81 लाख रुपये मिळतील. कॅनडा, ओमान आणि नामिबिया हे संघ साखळी फेरीतच बाहेर पडल्याने त्यांना सर्वात कमी रक्कम मिळाली आहे.
भारत 24.28 कोटी
न्यूझीलंड 13.09 कोटी
दक्षिण आफ्रिका 9.25 कोटी
इंग्लंड 8.96 कोटी
वेस्ट इंडीज 4.95 कोटी
पाकिस्तान 4.81 कोटी
झिम्बाब्वे 4.52 कोटी
श्रीलंका 4.38 कोटी
अफगाणिस्तान 2.85 कोटी
ऑस्ट्रेलिया 2.85 कोटी
अमेरिका (USA) 2.85 कोटी
Comments are closed.