टी-20 क्रमवारीत ‘टीम इंडिया’चा ऐतिहासिक दरारा; फलंदाजीत अभिषेक, गोलंदाजीत वरुण, तर अष्टपैलूंमध्ये हार्दिक अव्वल

आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या टी-20  क्रमवारीत ‘टीम इंडिया’ने इतिहास घडवलाय. क्रिकेटच्या एका फॉरमॅटमधील सर्व चार श्रेणींमध्ये (टीम क्रमवारी, फलंदाज, गोलंदाज अन् अष्टपैलू) एकाच संघाने अन् त्यांच्या खेळाडूंनी अव्वल स्थान मिळविण्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होय, हे विशेष.

जाहीर झालेल्या ताज्या गोलंदाजी क्रमवारीत वरुण चक्रवर्ती पहिल्यांदाच नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान झालाय. टी-20 रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवणारा तो तिसरा हिंदुस्थानी गोलंदाज ठरलाय. याआधी, जसप्रीत बुमराह आणि रवी बिष्णोई यांनी हे अव्वल यश मिळवले होते. ताज्या फलंदाजी क्रमवारीत अभिषेक शर्मा आपल्या कारकीर्दीतील सर्वोच्च रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. याचबरोबर अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंडय़ा अव्वल स्थानावर आलाय. याचबरोबर ‘टीम इंडिया’नेदेखील टी-20 क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले आहे.

वरुण चक्रवर्ती फॉर्मात

वरुण चक्रवर्ती या 34 वर्षीय फिरकीपटूने आशिया चषक स्पर्धेतही चमकदार खेळ केला आहे. यूएईविरुद्धच्या सामन्यात त्याने दोन षटकांत केवळ 4 धावा देत 1 बळी टिपला होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्याने 4 षटकांत 24 धावा देत 1 गडी बाद केला होता. या कामगिरीच्या जोरावर चक्रवर्तीने टी-20 क्रमवारीत तीन स्थानांची झेप घेत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफीला मागे टाकले.

राज्याभिषेक शर्माचे अव्वल ठिकाण देखभाल

टी-20 फलंदाजी क्रमवारीत अभिषेक शर्माने अव्वल स्थान  कायम राखले आहे. 14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 31 धावांची खेळी केली. इंग्लंडचा फिल साल्ट दुसऱ्या, तर जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा डेव्हाल्ड ब्रेविस दोन स्थानांच्या फायद्यासह 11 व्या स्थानी, तर एडेन मार्करम दहा स्थानांची झेप घेत 30 व्या स्थानी पोहोचला आहे.

संघ भारत अव्वल स्थानी

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने 271 रेटिंगसह आयसीसी टी-20 क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकाविले आहे. या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 266 रेटिंग गुण आहेत. इंग्लंडचा संघ 257 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे.

अष्टपैलूंमध्ये मनापासून पँडी क्रमांक वन

टी-20 आंतरराष्ट्रीय अष्टपैलूंमध्ये हिंदुस्थानचा स्टार खेळाडू हार्दिक पंडय़ा पहिल्या क्रमांकावर कायम आहे. पाकिस्तानचा सईम अय्यूब चार स्थानांची झेप घेत पाचव्या स्थानावर आला आहे, तर अभिषेक शर्मा अष्टपैलूंच्या यादीत चार स्थानांनी वर जाऊन 14 व्या क्रमांकावर पोहोचलाय.

Comments are closed.