ICC T20 WC 2026 – मैदानावरील ‘भाऊ’गिरी! टी-20 वर्ल्डकपमध्ये एकत्र खेळणाऱ्या भावंडांच्या 11 प्रसिद्ध जोड्या

टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्या पर्वापासून (2007) आतापर्यंत अनेक विक्रम, ऐतिहासिक खेळी आणि संस्मरणीय क्षण पाहायला मिळाले आहेत. मात्र फारच क्वचित प्रसंगी एकाच संघासाठी दोन सख्खे भाऊ एकत्र मैदानात फलंदाजी किंवा गोलंदाजी करताना दिसले आहेत. आतापर्यंत अशा एकूण अकरा जोड्या टी-20 विश्वचषकात एकत्र खेळल्या आहेत.

1) कॉलिन्स आणि डेव्हिड ओबुया – केनिया (2007) –

श्रीलंकेविरुद्ध पहिल्याच वर्ल्डकपमध्ये ओबुया बंधू एकत्र फलंदाजीला उतरले. मात्र ही भागीदारी केवळ 3 धावांवर संपली आणि केनियाला 172 धावांनी पराभव पत्करावा लागला.

2) मायकेल आणि डेव्हिड हसी – ऑस्ट्रेलिया (2009, 2010)

हसी बंधूंनी तीन वेळा एकत्र फलंदाजी केली. 2009 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 30 धावांची जलद भागीदारी, श्रीलंकेविरुद्ध 15 धावा आणि 2010 च्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध 23 चेंडूत 47 धावांची महत्त्वाची खेळी केली.

3) इरफान आणि युसूफ पठाण – हिंदुस्थान (2009)

हिंदुस्थानकडून पठाण बंधूंनी दोन सामने एकत्र खेळले. बांगलादेशविरुद्ध 11 धावा आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 10 धावांची भागीदारी त्यांनी केली.

4) केविन आणि नायल ओ’ब्रायन – आयर्लंड (2009, 2012)

श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदा केवळ दोन धावांची भागीदारी झाली. मात्र 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी 43 चेंडूत 52 धावांची शानदार भागीदारी करत सामना रंगतदार केला.

5) कामरान आणि उमर अकमल – पाकिस्तान (2010, 2014)

दोनही वेळा अकमल बंधू पाकिस्तानच्या विजयाचे शिल्पकार ठरले. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 51 धावा, तर 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 52 चेंडूत 96 धावांची निर्णायक भागीदारी त्यांनी केली.

6) नेथन आणि ब्रेंडन मॅकलम (2007, 2009, 2010, 2012, 2014)

न्यूझीलंड संघाकडून मॅकलम बंधू एकूण पाच टी-20 वर्ल्डकप एकत्र खेळले. ब्रेंडन मॅकलम वर्ल्डकपमध्ये 25 सामने खेळला तर, नेथन 22 सामने खेळला. 2007 मध्ये पहिल्याच लढतीत ब्रेंडन याने स्कॉटलंड विरुद्ध नाबाद 123 धावा फटकावल्या होत्या, तर नेथन याने 4 षटकात 26 धावा देऊन एक विकेट घेतली होती.

7) टॉम आणि बेन कूपर – नेदरलँड्स (2014)

2014 च्या स्पर्धेत कूपर बंधूंनी पाच वेळा एकत्र फलंदाजी केली. झिम्बाब्वेविरुद्धची 52 धावांची भागीदारी ही त्यांची सर्वोत्तम ठरली.

8) अँथनी आणि जस्टिन मोस्का – इटली (2026)

इटलीच्या पहिल्याच टी-20 विश्वचषक सामन्यात स्कॉटलंडविरुद्ध मोस्का बंधूंनी सलामी दिली. मात्र दुर्दैवाने त्यांची भागीदारी शून्यावरच संपली. परंतु दुसऱ्या लढतीत नेपाळविरुद्ध दोन्ही भावांनी 124 धावांची भागीदारी करत इटलीला 10 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला.

9) हॅरी आणि बेन मनेटी – इटली (2026)

याच सामन्यात मनेटी बंधूंनी 46 चेंडूत 73 धावांची झुंजार भागीदारी करत इटलीला आशा दिली, मात्र 208 धावांचे लक्ष्य पार करता आले नाही. नेपाळविरुद्ध बेन मनेटी याने 4 षटकात 9 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तर हॅरी मनेटी याने दोन कॅच घेतल्या आणि 1 रन आऊटही केला. संघाच्या विजयात दोघांनी मोलाचे योगदान दिले.

10) आरिफ आणि आसिफ शेख – नेपाळ (2026)

नेपाळने पहिल्या लढतीत बलाढ्य इंग्लंडच्या नाकीनऊ आणले होते. या लढतीत आरिफ शेखने 10 तर आसिफ शेखने 7 धावांचे योगदान दिले होते. तर दुसऱ्या लढतीत आरिफने 27, तर आसिफने 20 धावा केल्या होत्या. या दोन्ही लढतीत नेपाळचा पराभव झाला.

11) रॉस आणि मार्क ओडायर – आयर्लंड (2026)

श्रीलंके विरुद्ध रॉसने 34 धावा फटकावल्या होत्या, तर मार्कने 10 धावा केल्या होत्या आणि गोलंदाजीत एक विकेटही मिळवली होती. तर दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध रॉस आणि मार्कने प्रत्येकी 12 धावा केल्या. गोलंदाजीत मार्कने 2 विकेट्स घेतल्या. परंतु दोन्ही सामने आयर्लंडने गमावले.

Comments are closed.