Abhishek Sharma Hospitalised – गंभीरच्या घरी मेजवानी, पोटाचा संसर्ग अन् थेट रुग्णालयात दाखल; नामिबियाविरुद्ध खेळण्याबाबत साशंकता

आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत यजमान हिंदुस्थानने अमेरिकेविरुद्ध विजय मिळवत स्पर्धेची दमदार सुरुवात केली. हिंदुस्थानचा पुढील सामना नामिबियाविरुद्ध होणार आहे. 12 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर हा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकून सुपर-8 मध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने हिंदुस्थानचा संघ मैदानात उतरले. परंतु तत्पूर्वीच हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे. धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्मा याला पोटाच्या विकाराचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे गुरुवारी नामिबियाविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

हिंदुस्थानने मुंबईतील वानखेडे मैदानावर यूएसएविरुद्ध आपला पहिला सामना खेळला होता. या लढतीत हिंदुस्थानने यूएसएला 29 धावांनी नमवले. त्यानंतर हिंदुस्थानचा संघ राजधानी दिल्लीत दाखल झाला. दिल्लीत हिंदुस्थान नामिबियाविरुद्ध सामना खेळणार आहे. मात्र तत्पूर्वीच अभिषेक शर्मा याला पोटाच्या विकाराचा त्रास झाला. गेल्या दोन दिवसांपासून अभिषेकवर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “पोटाच्या संसर्गामुळे अभिषेकला रुग्णालयात भरती करावे लागले असून त्याच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेत. त्याला आज डिस्चार्ज मिळेल की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, नामिबियाविरुद्धच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता सध्या तरी खूप कमी आहे.”

दरम्यान, हिंदुस्थानचे संघ व्यवस्थापन अभिषेकच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्यापर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मैदानात परतेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

अभिषेकला नेमके काय झाले?

अभिषेक शर्मा रविवारी हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या घरी आयोजित मेजवानीला उपस्थित होता. मात्र, प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने तो इतर सहकाऱ्यांच्या आधीच तिथून निघाला होता. त्यानंतर संसर्ग वाढल्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.

Comments are closed.