ICC T20 WC 2026 – आयर्लंडची ओमानला ‘टकर’, मोठ्या विजयासह सुपर एटच्या आशा पल्लवित
आयर्लंडने ‘क’ गटातील महत्त्वाच्या लढतीत ओमानचा धुव्वा उडवित टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये ९६ धावांनी विजय मिळविला. या विजयासह आयर्लंडच्या सुपर एटमध्ये पोहोचण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लॉर्कन टकरने नाबाद ९४ धावा फटकावून दिलेली टक्कर या लढतीत निर्णायक ठरली.
आयर्लंडकडून मिळालेल्या २३६ धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना ओमनचा डाव १८ षटकांत केवळ १३९ धावांवरच गारद झाला. ४४ वर्षीय आमिर कलीमने २९ चेंडूत ५० धावांची आक्रमक खेळी करत इतिहास रचला. तो पुरुष टी-२० विश्वचषकातील सर्वांत ज्येष्ठ अर्धशतकवीर ठरला. मात्र, ३ बाद १०७ वरून ५ बाद १०८ अशी घसरण झाल्यानंतर ओमानचा डाव कोलमडला. जोश लिटलने महत्त्वाच्या टप्प्यावर दोन बळी घेत ओमानच्या आशा संपविल्या.
त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने ५ बाद २३५ धावांचा डोंगर उभारला. जखमी पॉल स्टर्लिंगच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या लॉर्कन टकरने ५१ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह ९४ धावांची नाबाद खेळी केली. आयर्लंडने अखेरच्या दहा षटकांत १५६ धावा चोपून सामन्याचे चित्रच पालटून टाकले.
Comments are closed.