ICC T20 WC 2026 – निस्सांकाचा डंका; हॅटट्रिकसह लंका ऐटीत सुपर एटमध्ये, ऑस्ट्रेलियावर साखळीतच बाद होण्याचे संकट
श्रीलंकेने पथुम निस्सांकाच्या लाजवाब शतकी खेळीच्या जोरावर मृत्यू गट असलेल्या ‘ब’ गटाचे गुंतागुंतीचे समीकरण सोडवत ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट राखून पराभव केला आणि मोठय़ा ऐटीत सुपर एटमध्ये स्थान मिळवले. लंकेच्या डंकेमुळे ऑस्ट्रेलियावर साखळीतच गारद होण्याची नामुष्की ओढावली असून मंगळवारी झिम्बाब्वेला आयर्लंडविरुद्ध विजय मिळवून सुपर एटमधील स्थान निश्चित करण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे.
ऑस्ट्रेलियासाठी आजचा सामना जिंकू किंवा मरू असा होता आणि ते जिंकू शकलेच नाहीत. कर्णधार मिशेल मार्श (54) आणि ट्रव्हिस हेड (56) यांनी 8.3 षटकांत 104 धावांची सलामी दिल्यानंतरही ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी घोर निराशा केली. पुढील 69 चेंडूंत 9 खेळाडू गमावत त्यांनी केवळ 73 धावा काढल्या. याच अपयशी कामगिरीमुळे ते श्रीलंकेसमोर मोठे लक्ष्य उभारू शकले नाहीत. परिणामतः श्रीलंकेच्या पथुम निस्सांकाने अखेर टी-20 वर्ल्ड कपला शतकाची सलामी देत ऑस्ट्रेलियाचा 8 विकेटनी धुव्वा उडवला. कुसल परेरा एका धावेवर बाद झाल्यानंतर निस्सांकाने कुसल मेंडिससह 97 धावांची भागी रचत संघाच्या विजयाचा पाया रचला आणि त्यानंतर पवन रत्नायकेच्या साथीने अभेद्य 79 धावांची भागी केली.
लढतीवर धावती नजर
शतकी सलामीनंतर ऑस्ट्रेलियाची मधली फळी कोसळली. जॉश इंग्लिस (27) आणि ग्लेन मॅक्सवेल (22) यांचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या गाठता आली नाही.
6 बाद 174 नंतर शेवटच्या 14 चेंडूंत ऑस्ट्रेलियाने केवळ 7 धावांत अर्धा संघ गमावला. विजयाच्या हॅटट्रिकसह सुपर एट गाठणारा झिम्बाब्वे चौथा संघ ठरला.
Comments are closed.