ICC T20 WC 2026 – सर्वात मोठा उलटफेर; झिम्बाब्वेने 19 वर्षानंतर केली इतिहासाची पुनरावृत्ती, कांगारूंना पराभवाचा धक्का

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयसीसी टी-20 विश्वचषकात शुक्रवारी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी धूळ चारत स्पर्धेतील पहिल्या मोठ्या विजयाची नोंद केली. वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझाराबानी आणि ब्रॅड इव्हान्स यांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, मात्र झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी तो चुकीचा ठरवला. सलामीवीर ब्रायन बॅनेटने 56 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी करत डावाला आकार दिला. त्याला मारुमणी (35) आणि रायन बर्ल (35) यांनी चांगली साथ दिली. अखेरच्या षटकांत कर्णधार सिकंदर रझाने अवघ्या 13 चेंडूत 25 धावा कुटल्यामुळे झिम्बाब्वेने 2 गड्यांच्या मोबदल्यात 169 धावांचा टप्पा गाठला.

170 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. मुझाराबानीने सुरुवातीलाच झटके दिल्याने पॉवर-प्लेमध्येच ऑस्ट्रेलियाचे 4 फलंदाज माघारी परतले होते. मॅट रेनशॉने (65) आणि ग्लेन मॅक्सवेलने (31) थोडा प्रतिकार केला, पण तो पुरेसा ठरला नाही.

अखेरच्या षटकांत टोनी मुन्योंगा याने बेन ड्वार्शिसचा घेतलेला चित्तथरारक झेल सामन्याचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. मुझाराबानीने 17 धावांत 4 बळी घेतले, तर ब्रॅड इव्हान्सने 23 धावांत 3 बळी टिपले. ऑस्ट्रेलियाचा डाव 19.3 षटकांत 146 धावांवर आटोपला.

2007 ची पुनरावृत्ती

2007 च्या पहिल्या टी-20 विश्वचषकात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला 5 गडी राखून हरवून जगाला चकित केले होते. तब्बल 19 वर्षांनंतर पुन्हा एकदा झिम्बाब्वेने त्याच इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.

धावफलक –

झिम्बाब्वे – 169/2 (20 षटके) – ब्रायन बॅनेट नाबाद 64, मारुमणी 35
ऑस्ट्रेलिया: 146/10 (19.3 षटके) – मॅट रेनशॉ 65, मुझाराबानी 4/17, इव्हान्स 3/23.

Comments are closed.