ICC T20 WC 2026 – झिम्बाब्वेच्या ‘मिस्टर कन्सिस्टंट’ समोर भल्या भल्या गोलंदाजांनी गुडघे टेकले; 3 सामने झाले, पण गडी बाद होईना!
हिंदुस्थान आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 मध्ये झिम्बाब्वेच्या संघाने दमदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीत झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि यजमान श्रीलंकेला पराभवाचा धक्का देत एकूण 3 सामने जिंकले, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. विशेष म्हणजे, या स्पर्धेत झिम्बाब्वेच्या संघाने अद्याप एकही पराभव स्वीकारलेला नाही. क्रिकेट हा खेळ सांघिक असला तरी झिम्बाब्वेच्या विजयामध्ये सलामीवीर खेळाडू ब्रायन बेनेट याचा सिंहाचा वाटा आहे.
वर्ल्डकप 2026 मध्ये 22 वर्षीय ब्रायन बेनेटने खोऱ्याने धावा वसूल केल्या आहेत. कौतुकाची बाब म्हणजे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत एकाही गोलंदाजाला बेनेटला बाद करता आलेले नाही. झिम्बाब्वेच्या ‘मिस्टर कन्सिस्टंट’ समोर भल्या भल्या गोलंदाजांनी गुडघे टेकले आहेत. साखळी फेरीतील तिन्ही लढतींमध्ये तो नाबाद राहिला आहे.
- झिम्बाब्वेचा पहिला सामना ओमानशी झाला होता. ओमानने दिलेले 104 धावांचे आव्हान झिम्बाब्वेने 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले होते. या लढतीत सलामीवीर ब्रायन बेनेट याने नाबाद 48 धावा फटकात संघाला विजय मिळवून दिला होता.
- त्यानंतर झिम्बाब्वेचा दुसरा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी झाला. या लढतीत झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली होती. ब्रायन बेनेट याने सलामीला येत अखेरपर्यंत नाबात राहत 64 धावा केल्या होत्या. या लढतीत झिम्बाब्वेने 169 धावांचा यशस्वी बचाव करत विजय मिळवला होता.
- झिम्बाब्वेचा तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर चौथ्या लढतीत झिम्बाब्वेने यजमान श्रीलंकेला पराभूत करण्याचा कारनामा केला. श्रीलंकेने दिलेले 179 धावांचे आव्हान झिम्बाब्वेने 19.3 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. या लढतीत ब्रायन बेनेट मैदानावर शड्डू ठोकून उभा होता. त्याने 48 चेंडूत नाबाद 63 धावांची मॅच विनिंग खेळी केली. तीन सामन्यात मिळून ब्रायन बेनेट याने 175 धावा फटकावल्या आहेत.
क्रिकेटचे बाळकडू
मी जेव्हा 3-4 वर्षांचा होतो, तेव्हा पहिल्यांदा हातात बॅट धरली. माझ्या वडिलांनी घरीच नेट बांधले होते. शाळेतून परतलो की आमचा सराव सुरू व्हायचा. मला एक जुळा आणि एक लहान भाऊ आहे. जुळा भाऊ सोबत असल्याने मी कधीच एकटा पडलो नाही, खेळायला नेहमीच जोडीदार असायचा, असे ब्रायन बेनेट सांगतो.
उज्ज्वल भविष्य
ब्रायन बेनेट याने आतापर्यंत 11 कसोटी, 11 एक दिवसीय आणि 55 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्याच्या नावावर दोन शतक आणि दोन अर्धशतकांसह 509 धावांची नोंद आहे. एक दिवसीय क्रिकेटमध्ये त्याने एका शतकासह 348 धावा केल्या आहेत, तर टी-20 मध्ये त्याने एक शतक आणि 11 अर्धशतकांसह 1,771 धावा चोपल्या आहेत. तो कामचलाऊ गोलंदाजीही करतो. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 विकेट्स घेतलेल्या आहेत. त्याचा एकंदरीत फॉर्म पाहता झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये त्याचे भविष्य उज्ज्वल दिसतेय.
Comments are closed.