शून्याच्या हॅट्ट्रीकनंतरही युवीचा शिष्य काही बदलायला तयार नाही! अभिषेक म्हणाला, “मला जे करायचे तेच करणार”

भारतीय पुरूष क्रिकेट संघ आयसीसी टी२० विश्वचषक २०२६च्या सुपर-८मध्ये पोहोचला. या चारही सामन्यामध्ये भारताच्या वेगवेगळ्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिले. गतविजेता संघ यंदाच्या स्पर्धेतील साखळी फेरीत अपराजित. त्यामध्ये केवळ एका खेळाडूचे योगदान संघाला हवे तसे मिळाले नाही, मात्र त्याचा काही फरक दिसला नाही. अभिषेक शर्मा हा त्याच्या कारकिर्दीतील एका वाईट प्रवासातून जात आहे. त्याने या स्पर्धेत तीन सामने खेळताना त्या तिन्हीमध्ये तो शून्यावर बाद झाला. त्यामुळे त्याच्यावर दबाव आला असून तो त्याच्या खेळात मात्र कोणताही बदल करणार नाही, असे वक्तव्य त्याने केले आहे.
जागतिक टी२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या २५ वर्षीय अभिषेकची फलंदाजीला सुरूवात करण्याची एक खास शैली आहे. तो नेहमी पहिला चेंडू आक्रमक पद्धतीने खेळतो. तशाच प्रकारे खेळताना त्याने भारताला चांगली सुरूवात करून दिली आहे. ही सुरूवात काहीशी जोखमीची असून त्याचा कधी-कधी त्याला नुकसानही झाले आहे. याचाच प्रत्यय टी२० विश्वचषकात आला आहे. त्याने त्या तीन डावांमध्ये केवळ ८ चेंडू खेळले आहेत. तसेच तो मागील ७ टी२० डावांमध्ये पाच वेळा शून्यावर बाद झाला आहे.
सध्या अभिषेक सरावात चांगली मेहनत करत असून त्याचा लवकरच लयीत परतण्याचा प्रयत्न आहे. तसेच त्याच्यावर कोणताही दबाव नाही, असे त्याने स्टार स्पोर्ट्सच्या एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे. “मी केवळ माझ्या फलंदाजीचा आस्वाद घेणार आहे. मी मागील दोन वर्षांपासून काळजी करणे आणि दबाव घेणे सोडले आहे. कारण त्यावर कसे नियंत्रण करावे हे माझ्या हातात आहे आणि त्यासाठी सरावही सुरू आहे. त्याच्यावर लक्ष असून मला हेच आवडते. त्यासाठी कोणताच दबाव नाही.”
“फलंदाजांच्या कारकिर्दीत नेहमीच चढ-उतार येत असतात. कधी धावा होतात, कधी नाही होत. मात्र मी ठरवले आहे मी एक खास प्रकारे खेळणार. यश मिळो अथवा न मिळो मी माझ्या खेळण्याच्या शैलीत किंवा विचारांमध्ये कोणताही बदलाव करणार नाही,” असेही अभिषेकने पुढे म्हटले आहे.
अभिषेकच्या फॉर्मची चिंता मात्र भारतीय चाहत्यांना आणि इतरांना आहे, मात्र त्याच्या आणि भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही असेच दिसते. सूर्यकुमारने तो फॉर्ममध्ये नसल्याचे टेंशन नाही, असे वक्तव्य केले होते.
सूर्यकुमारने म्हटले, “अभिषेकने मागील सामन्यांमध्ये भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. हा एक सांघिक खेळ आहे आणि असे टप्पे प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत येतात. गेल्या वर्षी अभिषेकने आम्हाला सावरले होते, या वेळी जर तो धावा करू शकत नसेल, तर आम्ही त्याच्यासाठी धावा करू.”
भारताचा आज (२२ फेब्रुवारी) सुपर-८चा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. संध्याकाळी ७ वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे.
Comments are closed.