टी20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंडची पाटी कोरीच, ‘इतक्यांदा’ झालायं पराभव, यंदा काय होईल?

क्रिकेटमध्ये सर्वाधिक रोमांचक सामने कोणामध्ये होतात, तर भारत विरुद्ध पाकिस्तान यांचे नाव सगळ्यात पहिले येते. या दोन्ही संघांमध्ये टी२० विश्वचषकात आतापर्यंत ९ सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये ८ सामने जिंकत भारताने त्यांचे वर्चस्व कायम ठेवले आहे. पाकिस्तानने मात्र एकच सामना जिंकला असून यावर्षीही भारतच वरचढ ठरला. या खेळामध्ये केवळ भारत-पाकिस्तान नाहीच तर दोन संघ असे आहेत ज्यामधील एकाची कामगिरी भारतासारखीच राहिली आहे.
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये पहिला उपांत्य फेरीचा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड असा रंगणार आहे. हा सामना ४ मार्चला कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकाला पराभूत करण्यासाठी न्यूझीलंडला टी२० विश्वचषकाच्या इतिहासासोबतही दोन हात करावे लागणार आहेत. गोंधळात टाकणारे वाटते, मात्र हे दोन्ही संघ जेव्हा-जेव्हा टी२० विश्वचषकात समोरा-समोर आले तेव्हा-तेव्हा दक्षिण आफ्रिकाच जिंकला आहे. तसेच न्यूझीलंडला एकदाही दक्षिण आफ्रिकेला पराभूत करता आले नाही.
दोन्ही संघांचे मागील सामन्यांचे निकाल पाहिले तर न्यूझीलंडसाठी एक उपांत्य सामना पुरेसा नाही. सध्याच्या न्यूझीलंड संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत, जे पराभवाची मालिका खंडीत करू शकतील. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघही चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्यांनी या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही आणि अशी कामगिरी करणारा तो एकमेव संघ आहे.
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात टी२० विश्वचषकात सर्वप्रथम लढत २००७मध्ये झाली होती. तो सामना दक्षिण आफ्रिकेने ६ विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर पुन्हा २००९मध्ये हे दोन संघ समोरा-समोर आले. तो सामना दक्षिण आफ्रिकेने एक धावांनी जिंकला होता.
२०१०मध्येही न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकेकडून १३ धावांनी हरला होता. २०१४च्या टी२० विश्वचषकातही दक्षिण आफ्रिकेने २ धावांनी सामना जिंकला होता. २०२६च्या साखळी फेरीतही हे दोन संघ भिडले होते. तो सामनाही दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्सने जिंकला होता. यामुळे हे समीकरण ५-० असे झाले असून दक्षिण आफ्रिका मोठ्या आघाडीवर आहे.
आता पुन्हा एकदा हे दोन संघ विरोधात उभे असून आताचा सामना उपांत्य फेरीचा आहे. यामध्ये न्यूझीलंड बाजी मारणार की पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका सरस ठरेल, हे पाहणे चुरशीचे होईल.
Comments are closed.