बाहेर पडण्याची नामुष्की! टीम इंडियाचे केवळ फलंदाजच नाहीतर गोलंदाजही काही कमी ‘विलन’…

टी२० क्रिकेट म्हटले की फलंदाजांना धावा करण्यापासून जेवढ्या लवकर थांबवता येईल तेवढे अधिक चांगले. या प्रकारामध्ये गोलंदाजीत केवळ उत्तम सुरूवात करूनच उपयोग नाही तर मिडल ओव्हर्स (मधल्या षटकात) आणि डेथ ओव्हर्समध्येही कामगिरीत सातत्य ठेवावे लागते आणि त्यावरूनच सामन्याचा निकाल लागतो. यामुळे संपूर्ण २० षटके उत्तम गोलंदाजी करणे महत्वाचे.

आयसीसी टी२० विश्वचषक पुरुषांच्या या दहाव्या आवृत्तीत गतविजेत्या भारताच्या फलंदाजीबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. संघाने साखळी फेरीचे सर्व सामने जिंकले, मात्र सुपर-८च्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. याला कारण केवळ फलंदाजी नाहीतर गोलंदाजीही तेवढीच जबाबदार आहे. भारताच्या गोलंदाजांची या स्पर्धेतील कामगिरी पाहिली तर ते सुरूवातीला विरोधी संघांच्या फलंदाजांना बाद करत आहेत, मात्र मधल्या आणि शेवटच्या षटकांमध्ये त्यांची कामगिरी कमी पडत आहे.

टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारताच्या प्रमुख गोलंदाजांची कामगिरी (आतापर्यंतची)-
वरुण चक्रवर्ती – ५ सामने, १० विकेट्स, ६.८१ इकॉनॉमी रेट
जसप्रीत बुमराह – ४ सामने, ७ विकेट्स, ५.३० इकॉनॉमी रेट
अक्षर पटेल – ३ सामने, ६ विकेट्स, ६.६३ इकॉनॉमी रेट
हार्दिक पांड्या – ५ सामने, ५ विकेट्स, ८.६६ इकॉनॉमी रेट
अर्शदीप सिंग – ४ सामने, ५ विकेट्स, ७.४२ इकॉनॉमी रेट
शिवम दुबे – ३ सामने, ४ विकेट्स, १०.६३ इकॉनॉमी रेट

वरुण आणि बुमराह संघाला सुरूवात चांगली देत आहेत, अक्षरही त्यात मागे नाही. यावरून भारत विकेट्स घेत आहेत, मात्र टी२० क्रिकेटमध्ये केवळ विकेट्स घेणेच पुरेसे नाही. विरोधी संघांवर दबाव आणत धावांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यामध्येच भारत मागे पडताना दिसत आहे.

७ ते १४ षटकांदरम्यान धावांची गती वाढते किंवा कमी होते. यामध्ये वरुण आणि अक्षरने काही वेळ नियंत्रण ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धही भारताने २० धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे संघाला सुरूवात तर चांगली मिळाली होती, मात्र डेवाल्ड ब्रेविस आणि डेविड मिलरने उत्तम खेळ तरत ९७ धावांची भागीदारी केली होती. यावरून भारताला सुरूवातीला विकेट्स मिळत असून नंतर मात्र ते धावा रोकण्यात आणि विकेट्स काढण्यात अपयशी ठरत आहेत.

टी२०मध्ये डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असते, त्यामध्येही बुमराह वगळता बाकी गोलंदाज अधिक धावा देत आहे. त्यामुळे विरोधी संघांच्या धावसंख्या वाढत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असेच झाले. मधल्या षटकात दुबे आणि शेवटच्या षटकात पांड्याने अधिक धावा दिल्या होत्या. त्या सामन्यात वरुणही महाग ठरला. त्याने ४ षटकात एक विकेट घेत ४७ धावा दिल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हार्दिकने ४ षटकात एकही विकेट न घेता ४५ धावा दिल्या. दुबेने २ षटकात ३२ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने भारताला २० षटकात १८८ धावसंख्येचे लक्ष्य दिले होते आणि भारताने तो सामना ७६ धावांनी गमावला होता.

पहिलाच सुपर-८चा सामना गमावल्याने भारताच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. यामध्ये भारताचा पुढील सामना २६ फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध आहे. हा सामना चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे.

Comments are closed.