T20 WC26: भारत सुपर-8 मध्ये कोणाला भिडणार? वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना कोलकातामध्ये खेळला जाणार

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी (१५ फेब्रुवारी) खेळला गेला. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला त्यांचा या स्पर्धेच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पराभव केला. हा सामना भारताने ६१ धावांनी जिंकला आणि गतविजेता सुपर-८ मध्ये दाखल झाला. यामुळे भारताचे सुपर-८ चे सामने आता कोणाशी होणार याचे तर्क-वितर्क लावले जात आहेत. ते जाणून घेऊ.
भारताने या स्पर्धेत ग्रुप ए मधील यूएसए, नामिबिया आणि पाकिस्तान यांना हरवत पुढील फेरी गाठली आहे. यामध्ये यजमान संघाचा शेवटचा ग्रुपमधील सामना नेदरलॅंड्सविरुद्ध आहे. तो १८ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. या स्पर्धेचा शेवटचा ग्रुप सामना २० फेब्रुवारीला खेळला जाणार असून तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान आहे. त्यानंतर २१ फेब्रुवारीपासून सुपर-८चे सामने सुरू होणार आहेत.
सुपर-८मध्ये भारताबरोबर वेस्ट इंडिजही पोहोचला असून दक्षिण आफ्रिकेचेही स्थान जवळपास निश्चितच आहे. त्यांनी ग्रुप डी मधील ३ पैकी ३ सामने जिंकले आहेत. याच ग्रुपमध्ये असणाऱ्या यूएईने अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका विरुद्धचे सामने जिंकले तर ते गुणतालिकेत पहिल्या स्थानी येतील, मात्र दक्षिण आफ्रिकेची कामगिरी पाहता हे अशक्य आहे. यामुळे २२ फेब्रुवारीला भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होण्याची दाट शक्यता आहे. सुपर-८चा भारताचा हा पहिला सामना अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे.
तसेच दुसरा सामना २६ फेब्रुवारीला चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे. यामध्ये भारताचा सामना झिम्बाब्वे किंवा ऑस्ट्रेलियाशी होईल. ग्रुप बी मध्ये असणारे हे दोन संघ आतापर्यंत दोन सामन्यात खेळले आहेत. त्यामधील एका सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. त्यामुळे झिम्बाब्वेने त्यांचे खेळलेले दोन्ही सामने जिंकले, तर ऑस्ट्रेलियाने २ पैकी एकच सामना जिंकला आहे. यावरून भारताचा सुपर-८चा दुसरा सामना या दोन्हींपैकी एकाशी होईल.
भारताचा तिसरा सुपर-८चा सामन्यातील विरोधी संघ निश्चित झाला आहे. हा सामना १ मार्चला कोलकातामध्ये खेळला जाणार आहे. यामध्ये स्पर्धेचे दोन वेळेचे चॅम्पियन संघ भारत-वेस्ट इंडिज भिडणार आहेत.
भारताचे सुपर-८ चे सामने:
२२ फेब्रुवारी – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका/यूएई, अहमदाबाद
२६ फेब्रुवारी – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया/झिम्बाब्वे/आयर्लंड, चेन्नई
१ मार्च – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, कोलकाता
Comments are closed.