ICC T20 World cup आज सुखद धक्क्याची आशा, जिगरबाज झिम्बाब्वेला बाहेर काढण्यासाठी हिंदुस्थान सज्ज
अहमदाबादला एक जबर धक्का बसला होता, मात्र चेन्नईच्या चिदंबरमवर एक सुखद धक्का बसावा, या आशेसह हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमी पुन्हा एकदा सोल्ड आऊट गर्दी करणार आहेत. वर्ल्ड कपच्या सुपर-8 फेरीत गतविजेत्या हिंदुस्थानसमोर झिम्बाब्वेचे आव्हान उभे ठाकले आहे. दोन्ही संघांनी पहिल्या लढती गमावल्यामुळे ही केवळ एक लढत उरलेली नाही, तर उपांत्य फेरीचे स्वप्न जिवंत ठेवण्याची अंतिम संधी आहे. विजय पुरेसा नाही, मोठा विजय हवाय. त्यामुळे चेन्नईच्या ऐतिहासिक मैदानावर हिंदुस्थानी खेळाडू जिवाची बाजी लावताना दिसतील. जगज्जेतेपद राखण्यासाठी आधी आजचा संघर्ष जिंकावा लागणार आहे.
बुमराचा भेदक मारा, फलंदाजांची जबाबदारी
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला असला तरी जसप्रीत बुमराने 15 धावांत 3 विकेट अशी भेदक कामगिरी करत आशेचा किरण दाखवला. आता त्याच आक्रमकतेला साथ देण्याची वेळ फलंदाजांवर आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील फलंदाजांनी सुरुवातीपासूनच दबाव टाकला तर चेपॉकच्या फलंदाजपूरक खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडू शकतो. मोठय़ा फरकाने विजय मिळवण्यासाठी पहिल्याच चेंडूपासून आक्रमण हाच मंत्र असेल. पण सलामीवीरांना प्रारंभापासूनच गोलंदाजांना ठोकावेच लागेल. अन्यथा क्रिकेटप्रेमी त्यांना ठोकतील.
हलक्यात घेऊ नका! झिम्बाब्वेचा इशारा
झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांसारख्या बलाढय़ संघांना धक्का देत सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ही लढत सहजसोपी मुळीच नाही. कर्णधार सिपंदर रझा आणि वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझरबानी सुरुवातीच्या षटकांतच सामना फिरवू शकतात. ताडीवानाशे मरुमणीची धडाकेबाज फलंदाजीही हिंदुस्थानसाठी सावधतेचा इशारा आहे. परंतु, आव्हान जितके कठीण तितकाच विजय गाजतो, हीच खरी या स्पर्धेची मजा आहे.
बदलांची पूर्ण शक्यता
या महत्त्वाच्या लढतीत संजू सॅमसनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर अक्षर पटेल किंवा कुलदीप यादव यांपैकी एकाला अंतिम अकरात स्थान मिळू शकते. योग्य समतोल साधत निर्णायक डावपेच आखणे ही संघव्यवस्थापनाची कसोटी ठरेल. उपांत्य फेरीचे स्वप्न अजून जिवंत आहे आणि ते साकार करण्याची ताकदही हिंदुस्थानकडे आहे. गरज आहे ती फक्त निर्भीड खेळाची आणि जिंकण्याच्या जिद्दीची. तो खेळ आणि जिद्द चेन्नईत दिसेल, असा विश्वास आहे.
Comments are closed.