टी20 वर्ल्डकपवर बहिष्कार टाकला तर पाकिस्तानचं काय खरं नाही! आयसीसी करणार चेकमेट…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला आता फक्त दहा दिवसांपेक्षा कमी कालावधी उरला असून, मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) अजूनही निर्णायक भूमिका घेताना दिसत आहे. स्पर्धेत सहभागी व्हायचे की नाही? भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकायचा की नाही? या सर्व चर्चांमध्ये पीसीबीने निर्णय पाकिस्तान सरकारच्या हातात सोपवला आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतरच अंतिम निर्णय होईल.

पाकिस्तानी मीडियाच्या अहवालांनुसार, जर पीसीबीने स्पर्धेतून माघार घेतली, तर त्यांना आयसीसीकडून मोठ्या आर्थिक दंडाचा सामना करावा लागू शकतो. या प्रकरणात अंदाजे 38 दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे 350 कोटी रुपयांचा दावा ठोकला जाऊ शकतो. फक्त हीच जबाबदारी नाही, तर भारताविरुद्ध खेळल्या नाहीत तरी प्रसारकांकडून भरपाईसाठी दावे दाखल होऊ शकतात. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या पीसीबीसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

पाकिस्तान टी20 विश्वचषक 2026मध्ये नाही खेळला तर आयसीसीची कडक कारवाई

पाकिस्तान कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघासोबत द्विपक्षीय मालिका खेळू शकणार नाही
पाकिस्तानचे आशिया कपचे सदस्यत्व रद्द
पाकिस्तानला पीएसएलसाठी विदेशी खेळाडूंना करारबद्ध करता येणार नाही (रिपोर्ट्सनुसार)

आयसीसीने स्पष्ट केले आहे की, टी20 वर्ल्डकप किंवा चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या जागतिक स्पर्धेतून बाहेर राहिल्यास पाकिस्तानवर कारवाई होईल. त्यांच्यावर भविष्यातील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यावरही बंदी लागू शकते. याशिवाय, पाकिस्तानमध्ये सुपर लीग किंवा इतर आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करताना खेळाडूंना एनओसी (No Objection Certificate) मिळण्यास अडथळा येईल, ज्यामुळे पीसीबीला आणखी आर्थिक व नियामक तोटा होऊ शकतो.

पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचे वक्तव्य सध्या संभ्रम निर्माण करणारे ठरत आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूही या स्पर्धेतून माघार घेण्याचा सल्ला देत आहेत. मात्र आसीसीचे कठोर नियम आणि संभाव्य दंड लक्षात घेतल्यास, पाकिस्तानला बहिष्कार टाकण्याची शक्यता कमी आहे.

टी20 वर्ल्डकपच्या सगळ्या तयारीच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या निर्णयावर जगभराची नजर लागली आहे. काही दिवसांत पीसीबीने स्पर्धेत भाग घेण्याबाबत अंतिम निर्णय देणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना आर्थिक आणि क्रिकेट प्रशासनाच्या दृष्टिकोनातून मोठा तोटा भोगावा लागू शकतो. आयसीसीची कारवाई, प्रसारकांचा दंड आणि भविष्यकालीन स्पर्धांमधील अडथळे. या सर्व गोष्टी पीसीबीच्या पुढील निर्णयावर मोठा परिणाम करणार आहेत.

Comments are closed.