एक पराभव अन् 3 खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त! 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन निरोप, व्हिडिओ पाहाच

आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ मध्ये शनिवारी (२७ जून) इंग्लंडने न्यूझीलंडचा ९ विकेट्सने पराभव केला. यामुळे गतविजेत्या न्यूझीलंडचा या विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आला. लंडनच्या ओव्हलवर खेळल्या गेलेल्या या सामन्यातील पराभव केवळ किवी संघासाठीच निराशाजनक नव्हता, तर त्यामुळे न्यूझीलंड क्रिकेटमधील एका सुवर्णयुगाचा अंतही झाला. या सामन्यानंतर न्यूझीलंडच्या तीन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर सोफी डिव्हाईन, सूझी बेट्स आणि लिआ ताहुहू या न्यूझीलंडच्या महान खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यांच्या न्यूझीलंड कारकिर्दीच्या अखेरीस गार्ड ऑफ ऑनर देत भावपूर्ण निरोप देण्यात आला. अशाप्रकारचा निरोप दिग्गजांना अपेक्षित नव्हता, मात्र या तिन्ही खेळाडूंची कारकिर्द विश्वसनीय आणि ऐतिहासिक राहिली आहे.

सूझी बेट्स न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ आणि सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू म्हणून निवृत्त होत आहे. बेट्सने तिच्या ३७० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विक्रमी १०,७२१ धावा केल्या, जो एक विशेष विक्रम आहे. सोफी डिव्हाइनने आपल्या २० वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत न्यूझीलंडसाठी ३१७ सामने खेळले. या दरम्यान तिने वनडे सामन्यांमध्ये ४२७९ धावा आणि टी२० मध्ये ३८१७ धावा केल्या. त्याचबरोबर तिने २४१ विकेट्सही घेतल्या. त्यामुळे ती सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे.

न्यूझीलंडची प्रमुख वेगवान गोलंदाज असलेल्या लिआ ताहुहूने आपल्या १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत संघाचे २०७ सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले. तिने २२५ विकेट्स घेतल्या. सामना झाल्यानंतर न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांतील खेळाड-सपोर्ट स्टाफ मैदानावर एकत्र आले. त्या सर्वांनी मिळून या तीन दिग्गज खेळाडूंना गार्ड ऑफ ऑनर दिला. आयसीसीने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

सामन्याची स्थिती पाहिली तर, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ विकेट्स गमावत १६३ धावा केल्या. त्यामध्ये अमेलिया केरने सर्वाधिक धावा केल्या. तिने ३४ चेंडूंत ४२ धावा केल्या. माजी कर्णधार, सोफी डिव्हाईन तिच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात उत्तम फॉर्ममध्ये दिसली. तिने १४ चेंडूंत ३ षटकारांसह ३० धावा केल्या. तसेच बेट्सनेही डावाच्या शेवटच्या चेंडूवर धावबाद होण्याआधी १३ चेंडूंत १९ धावा केल्या. ताहुहूनेला मात्र एकही विकेट मिळाली नाही.

या स्पर्धेत न्यूझीलंडची कामगिरी निराशाजनक झाली. त्यांनी खेळलेल्या ५ पैकी केवळ २ सामने जिंकले.

Comments are closed.