आम्ही जगज्जेते होऊ शकतो! – कर्णधार हरमनप्रीत कौर

मंगळवारपासून सुरू होत असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत युवा आणि अनुभवी खेळाडूंनी सजलेला हिंदुस्थानी संघ जगज्जेता होऊ शकतो, असा विश्वास कर्णधार हरमनप्रीत कौर हिने व्यक्त केला.
हरमनप्रीत म्हणाली, ‘आमच्या विश्वचषक संघात सर्व विभागांत युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य समन्वय आहे. स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, प्रतीका रावल, ऋचा घोष आणि उमा छेत्री यांसारखे प्रतिभावान फलंदाज आमच्याकडे आहेत.’
स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन अर्धशतके ठोकली, तर तिची सलामी जोडीदार प्रतीका रावलनेही उत्कृष्ट कामगिरी केली. गोलंदाजीत रेणुका ठाकूरने खास कामगिरी केली. अलीकडील मालिकेत पराभव झाला असला तरी हिंदुस्थानी संघाने कडवी लढत दिलेली होती.
हरमनप्रीत पुढे म्हणाली, ‘गोलंदाजी आमचे बलस्थान आहे. रेणुका ठाकूर आणि अंशुमती रेड्डीबरोबरच क्रांती गौड, श्री चरणी आणि राधा यादव यांच्यावर हिंदुस्थानची मदार असेल. तसेच पूजा वस्त्राकर, स्नेह राणा आणि अमनजोत कौरसारख्या तीन अष्टपैलू खेळाडू नक्कीच संघाची ताकद वाढवतात. सांघिक कामगिरी, कठोर मेहनत, सकारात्मकता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आम्ही या विश्वचषकात यश मिळवू शकतो.’
Comments are closed.