IND W Vs NZ W – दिवाळी धमाका; स्मृती आणि प्रतिकाने न्यूझीलंडला फोडून काढलं, खणखणीत शतके आणि ऐतिहासिक भागीदारी

ICC Women’s World Cup 2025 मध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना सुरू आहे. टीम इंडियासाठी हा सामना ‘करो या मरो’चा आहे. याच सामन्यात टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीने आपल्या फलंदाजीने न्यूझीलंडला दिवसा तारे दाखवले आहेत. दोघींनी मिळून पहिल्या विकेटसाठी 212 धावांची विक्रमी भागीदारी करत टीम इंडियाला विस्फोटक सुरुवात करून दिली. सलामीला आलेल्या हिंदुस्थानच्या दोन्ही फलंदाजांनी शतक ठोकल्याची ही पहिलीच वेळ आहे. तर विश्वचषकात अशी कामगिरी करणारे ही तिसरी जोडी ठरली आहे.
वर्ल्ड कपमध्ये स्मृती मानधनाची बॅट आतापर्यंत काहीशी शांत होती. मात्र, आजच्या सामन्यात तिची बॅट चांगलीच तळपली आणि तिने 95 चेंडूंचा सामना करत 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 109 धावांची सलामी दिली. स्मृतीने आपलं 14व वनडे शतकं साजर केलं. या शतकासह महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारी स्मृती दुसरी फलंदाज ठरली आहे. तर प्रतिका रावलनेही आपले हात धुवून घेत 112 चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. तिने 134 चेंडूंचा सामना केला आणि 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 122 धावा चोपून काढल्या. दोघींनी मिळून विक्रमी 212 धावांची भागीदारी केली आहे. यापूर्वी 2022 साली हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधनाने 184 धावांची भागीदारी केली होती. तसेच विश्वचषकात तिरुष कामिनी आणि पुनम राऊत यांचा सलामीला येत 175 धावांच्या भागीदारीचा विक्रम सुद्धा स्मृती आणि प्रतिकाने मोडित काढला आहे.
महिला विश्वचषकामध्ये सलामीच्या जोडीने शतक ठोकण्याची ही तिसरीच वेळ ठरली आहे. यापूर्वी सर्वप्रथम अशी कामगिरी इंग्लंडच्या लिन थॉमस आणि एनिड बेकवेल यांनी 1973 साली केली होती. त्यानंतर 1988 साली ऑस्ट्रेलियाच्या लिंडसे रीलर आणि रुथ बकस्टीन यांनी नेदर्लंडविरुद्ध सलामीला येत शतके ठोकली होती. त्यानंतर आता टीम इंडियाच्या स्मृती आणि प्रतिका यांनी सलामीला येत शतके ठोकण्याची कामगिरी केली आहे.
Comments are closed.