ऑस्ट्रेलिया नंबर 1, वेस्ट इंडिजला मोठा फटका; सलग 2 कसोटी सामने जिंकल्याने भारताला फायदा किती?


आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबल: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज (India beat West Indies in Delhi Test) यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने 7 गडी राखून विजय मिळवला. या शानदार विजयासह भारताच्या खात्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 साठी आणखी 12 गुणांची भर पडली, आता भारताचे एकूण गुण 40 वरून 52 झाले आहेत. पण या विजयानंतरही भारत तिसऱ्या स्थानावर कायम आहे, त्याचा पॉइंट टक्केवारी (PCT) 55.56% वरून वाढून 61.90% झाली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलिया नंबर 1 (Australia WTC Points Table)

ताज्या गुणतालिकेनुसार, ऑस्ट्रेलिया 100 टक्के पॉइंट टक्केवारीसह अव्वल स्थानावर आहे. या संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले असून, तिन्हीमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे 36 गुण आणि 100% पॉइंट टक्केवारी आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्धच्या दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने आपली आघाडी पक्की केली.

श्रीलंका दुसऱ्या, भारत तिसऱ्या स्थानी

श्रीलंका दोन सामन्यांत एक विजय आणि एक पराभवासह दुसऱ्या स्थानावर आहे. तिचा पॉइंट टक्केवारी 66.67% आहे. भारताचा सहा सामन्यांत तीन विजय, दोन पराभव आणि एक सामना अनिर्णीत राहिला आहे, तो तिसऱ्या स्थानी कायम आहे. दिल्ली कसोटीतील विजयामुळे भारताचे गुण 52 झाले असले तरी, पॉइंट टक्केवारीच्या आधारे तो अद्याप श्रीलंकेच्या मागे आहे. भारतातील कामगिरी निश्चितच सुधारलेली आहे, परंतु टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत उत्कृष्ट प्रदर्शन गरजेचे आहे. टीम इंडिया सध्याच्या लयीत खेळत राहिली, तर 2027 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचणे अवघड ठरणार नाही.

बांगलादेश आणि वेस्ट इंडिज तळाशी

इंग्लंड दोन विजय, दोन पराभव आणि एक ड्रॉसह 43.33% PCT घेऊन चौथ्या स्थानी आहे. बांगलादेश आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांचा मात्र तळाच्या क्रमांकात समावेश आहे. बांगलादेशने दोन सामन्यांत फक्त एक ड्रॉ साधला असून त्याचा पॉइंट टक्केवारी 16.67% आहे, तर वेस्ट इंडिजने खेळलेले सर्व पाच कसोटी सामने गमावले असून त्यांची पॉइंट टक्केवारी 0% आहे.

दिल्ली कसोटीत टीम इंडियाचा मोठा विजय

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने यशस्वी जैसवाल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर 518 धावांचा डोंगर उभारला आणि पहिली डाव घोषित केला. प्रत्युत्तर वेस्ट इंडिजचा पहिला डाव केवळ 248 धावांवर आटोपला. मालिकेत वेस्ट इंडिजची फलंदाजी आतापर्यंत निराशाजनक राहिल्याने भारताने त्यांना फॉलोऑन दिला. मात्र, फॉलोऑन मिळाल्यानंतर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी पुनरागमन करत 390 धावा करत भारतावर आघाडी मिळवली. भारतीय कसोटी इतिहासात ही फक्त चौथी वेळ आहे, जेव्हा टीम इंडियाला प्रतिस्पर्धी संघाने फॉलोऑन देऊन पुन्हा फलंदाजीस उतरायला भाग पाडले. शेवटी वेस्ट इंडिजने भारतासमोर 121 धावांचे लक्ष्य ठेवले, जे टीम इंडियाने सहज गाठत दुसऱ्या कसोटीत 7 गडी राखून विजय मिळवला.

हे ही वाचा –

IND Beat WI 2nd Delhi Test : भारताचा वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश, दिल्ली कसोटी जिंकत मालिका 2-0 ने घातली खिशात; WTC च्या Points Table मध्ये टीम इंडिया कुठे?

आणखी वाचा

Comments are closed.