ICC चा गजब कारभार? दोन दिवसांत संपलेली पर्थ कसोटी ‘अत्यंत उत्तम’, पण भारताची पिच ‘खराब’; नेमकं असं का घडलं?

कसोटी क्रिकेटमधील खेळपट्टी मूल्यांकनावरून पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) अ‍ॅशेस मालिकेतील पर्थ कसोटी पिचला ‘वेरी गुड’ म्हणजेच ‘अत्यंत उत्तम’ रेटिंग दिल्यानंतर हा विषय अधिकच तापला आहे. कारण हा सामना अवघ्या दोन दिवसांत संपला होता.

पर्थ कसोटीला मिळालेल्या उच्च रेटिंगनं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सामना फक्त 847 चेंडूत संपला. पहिल्याच दिवशी तब्बल 19 विकेट्स पडल्या. हा ऑस्ट्रेलियातील इतिहासातील दुसरा सर्वात लहान कसोटी सामना तर अ‍ॅशेस मालिकेत 1888 नंतरचा सर्वात लवकर संपलेला सामना ठरला. तरीही सामना रेफरी रंजन मदुगाले यांनी पिचचे कौतुक करत ते संतुलित असल्याचे सांगितले.

दुसरीकडे, भारतात वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या अहमदाबाद आणि दिल्ली कसोटी सामन्यांमध्ये पिच पूर्ण 3 ते 5 दिवस टिकले. सामने वेळेपूर्वी संपले नाहीत, खेळात कोणताही अनैसर्गिक कल दिसला नाही. तरीही रेफरी अँडी पाइक्रॉफ्ट यांनी या दोन्ही पिचला ‘सॅटिसफॅक्टरी’ म्हणजेच ‘संतोषजनक’ असेच मूल्यांकन दिले.

आयसीसीच्या पिच रेटिंग प्रणालीमध्ये चार स्तर आहेत. ‘अत्यंत उत्तम’, ‘चांगली’, ‘संतोषजनक’ आणि ‘सरासरीपेक्षा कमी’. पर्थ पिचला सर्वोच्च रेटिंग देताना आयसीसीने तिथल्या खेळात दोन्ही बाजूंना संधी मिळाल्याचे कारण दिले. फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही पिचने मदत केल्याचा दावा करण्यात आला.

सामना दोन दिवसांत संपल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठे आर्थिक नुकसान झाले. अंदाजे 3 ते 4 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलरचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. तरीही त्यांना आयसीसीचे मूल्यांकन मान्यच असल्याचे दिसले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही दुसऱ्या दिवसापासून पिच फलंदाजांसाठी अनुकूल होत गेल्याचा दावा केला.

दरम्यान, आता सर्वांचे लक्ष 4 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या गाबा डे-नाईट कसोटीवर आहे. 2022-23 च्या गाबा कसोटीला ‘बिलो ऍव्हरेज’ म्हणजेच ‘सरासरीपेक्षा कमी’ असे रेटिंग मिळाले होते. मात्र या वेळीची पिच पाच दिवस टिकेल, असा विश्वास पिच क्यूरेटर डेव सँडुर्स्की यांनी व्यक्त केला आहे.

Comments are closed.