आईस्क्रीम शब्दावर उत्तर कोरियात बंदी, हुकूमशहा किम जोंग उन यांचे आता नवे फर्मान

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे जे काही सांगतील ती पूर्वदिशा असते. त्यांना कोणती गोष्ट पटेल किंवा कोणती गोष्ट कधी खटकेल याचा जराही नेम नाही. किम जोंग उन यांनी उत्तर कोरियामध्ये आईस्क्रीम शब्दावर बंदी घातली असून तसा हुकूम जनतेला सोडला आहे. जर यापुढे देशात कोणीही आईस्क्रीम शब्द उच्चारला तर त्याची गय केली जाणार नाही. त्यामुळे आता उत्तर कोरियातील लोकांना आईस्क्रीमऐवजी एसेउकिमो किंवा ईओरेम्बोसुंगी बोलावे लागणार आहे. उत्तर कोरियामध्ये पाश्चात्त्य संस्कृती आणि दक्षिण कोरियाई शब्द हद्दपार करण्याची नवीन मोहीम सुरू करण्यात आली आहे. किम जोंग उन यांना फक्त आईस्क्रीम शब्दाची समस्या आहे, असे मुळीच नाही. उत्तर कोरियात असे अनेक शब्द आहेत, ज्यांवर देशात याआधीच बंदी घातलेली आहे. हॅमबर्गर आणि कराओके मशीनसुद्धा या यादीत असून हॅमबर्गर हा शब्द प्रसिद्ध आहे, पण उत्तर कोरियामध्ये तो बोलण्यास मनाई आहे.
हॅमबर्गरला ‘दाजिन-गोगी ग्योप्पांग’ असे म्हणतात, ज्याचा अर्थ ‘ग्राऊंड बीफसोबत डबल ब्रेड’ असा होतो. कराओके मशीनला ‘ऑन स्क्रीन अकॉम्पनिमेंट मशीन’ असे म्हटले जाते. उत्तर कोरियामध्ये परदेशी टीव्ही मालिका, कोरियन ड्रामा वितरित केल्याबद्दल थेट मृत्युदंडाची शिक्षा देण्यात येते, असेही काही रिपोर्टमधून समोर आले आहे. शॉक सिक्रेड उत्तर कोरियात हुकूमशाहीमुळे लोकांना स्वातंत्र्याला मुकावे लागत आहे. उत्तर कोरिया समुद्रकिनारी असलेले शहर वॉनसनला एक लक्झरी रिसॉर्ट केंद्र म्हणून विकसित करत आहे. या शहराला आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी 20 ते 30 लोकांना टूर गाईड म्हणून प्रशिक्षण दिले जात आहे. या गाईडना विदेशी शब्द न वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Comments are closed.