झारखंडमधील सारंडा येथे आयईडी स्फोट

दोन कोब्रा सैनिक जखमी, विमानाने रांची येथे हलविले

वृत्तसंस्था/ रांची

नक्षलवादाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यादरम्यान झारखंडच्या सारंडा जंगलात शनिवारी आयईडी स्फोटाची घटना घडली आहे. जंगलभागात नक्षलवाद्यांचा शोध सुरू असताना झालेल्या या स्फोटात कोब्रा बटालियनचे दोन शूर सैनिक गंभीर जखमी झाले. जखमी सैनिकांची ओळख हवालदार दिनेश राऊत आणि बलजिंदर सिंग अशी झाली आहे. महाराष्ट्रातील रहिवासी दिनेश राऊत यांच्या डाव्या पायाला स्फोटात गंभीर दुखापत झाली, तर पंजाबमधील रहिवासी बलजिंदर सिंग यांना स्फोटक तुकड्यांमुळे (स्प्लिंटर्स) दुखापत झाली. दोघांनाही एअरलिफ्ट करून उपचारासाठी रांची येथे हलविण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी आता या भागात आपली उपस्थिती आणखी मजबूत केली आहे.

झारखंडच्या अत्यंत नक्षलग्रस्त पश्चिम सिंहभूम जिह्यातील सारंडा वनक्षेत्रात नक्षलवाद्यांनी शनिवारी पुन्हा एकदा ‘छुपा हल्ला’ केला. छोटानाग्राह पोलीस स्थानक परिसरातील चद्रीदेरा गावाजवळ हा मोठा स्फोट झाला. याप्रसंगी सीआरपीएफच्या कोब्रा बटालियन-209 चे सैनिक नक्षलविरोधी सखोल शोधमोहीम राबवत होते. सुरक्षा दलांना या भागात नक्षलवादी हालचालींबद्दल माहिती मिळाल्यानंतर सैनिकांच्या संयुक्त पथकाने सघन शोधमोहीम सुरू केली होती. पथक चद्रीदेरा गावाजवळ येताच एका सैनिकाने नक्षलवाद्यांनी जमिनीखाली पेरलेल्या शक्तिशाली प्रेशर आयईडीवर पाऊल ठेवल्यामुळे संपूर्ण वनक्षेत्र हादरले. स्फोटानंतर लगेचच अतिरिक्त सुरक्षा दलांना त्या भागात पाठवण्यात आले असून संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला. जखमी सैनिकांना प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेत त्यांना ताबडतोब हेलिकॉप्टरने रांची येथे नेण्यात आले. सध्या डॉक्टरांनी दोन्ही सैनिकांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.

Comments are closed.