'मी बोललो तर वाद होईल…' अजित आगरकर यांना मोहम्मद शमीने दिले थेट प्रत्युत्तर

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर मोहम्मद शमीला राष्ट्रीय संघात स्थान मिळालेले नाही. काही दिवसांपूर्वी या वेगवान गोलंदाजाने मोठे विधान करत सांगितले होते की बीसीसीआयने त्याच्या फिटनेसबद्दल माहिती घेण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधलेलाच नाही. तर दुसरीकडे, मुख्य निवडकर्ता अजीत आगरकर यांनी म्हटले होते की शमी फिटनेसच्या कारणामुळे संघात नाही. आता शमी रणजी ट्रॉफीत जबरदस्त कामगिरी करत आहे. पहिल्या सामन्यात त्याने 7 विकेट घेतल्या, तर गुजरातविरुद्ध दुसऱ्या सामन्यात त्याने एकूण 8 विकेट मिळवल्या. दुसऱ्या डावात 5 विकेट घेतल्यानंतर त्याने माध्यमांशी बोलताना मोठे वक्तव्य केले.

अगरकर यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना मोहम्मद शमी म्हणाले होते, “माझ्या फिटनेसबाबत अपडेट देणे ही माझी जबाबदारी नाही. माझे काम आहे एनसीएला जाणे, तयारी करणे आणि सामने खेळणे. कोणाला अपडेट मिळाले किंवा नाही, ही त्यांची गोष्ट आहे, माझी नाही.”

या विधानावर आगरकर यांनी उत्तर दिले होते की त्यांनी शमीशी त्यांच्या निवडीबाबत बोलणे केले होते, आणि जर शमीला काही अडचण असेल तर ते पुन्हा त्याच्याशी चर्चा करतील. अगरकर यांनी हेही सांगितले की बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमच्या मते शमी अजून आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी पूर्णपणे तयार नाही. यावर प्रतिक्रिया देताना शमी म्हणाला होता, “त्यांना जे बोलायचं आहे, ते बोलू दे.”

मुख्य निवडकर्ता आणि मोहम्मद शमी यांच्यात तणावाचे वातावरण दिसत असतानाच, नुकतेच बीसीसीआयचे (सेंट्रल झोन) निवडकर्ता म्हणून नियुक्त झालेले आर. पी. सिंग रणजी ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान शमीला भेटायला गेले. त्यांना शमीशी संवाद साधताना पाहिले गेले.

रणजी ट्रॉफीत गुजरातविरुद्ध 5 विकेट घेतल्यानंतर बंगालचा खेळाडू मोहम्मद शमी पत्रकारांशी बोलताना खूप संयमित दिसला आणि त्याने काळजी घेतली की त्याच्या वक्तव्यामुळे कोणताही वाद निर्माण होऊ नये. तो म्हणाला, “मी नेहमीच वादांमध्ये अडकतो, तुम्ही (माध्यमांनी) मला असाच गोलंदाज बनवलात. मी काही बोललो तर गोंधळ होईल. आता मी काय बोलू? मी तुम्हाला दोषही देऊ शकत नाही, सगळेच असेच करतात. सोशल मीडियावरही लोक काहीही बोलतात.”

Comments are closed.