दुसरा कसोटी पराभूत झाल्यास टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचू शकेल का? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!

गुवाहाटी कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव 201 धावांत आटोपला (IND vs SA). पहिल्या डावात 288 धावांची प्रचंड आघाडी घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेनं आता मालिकेत भारताला 2-0 ने पराभूत करण्याची जवळजवळ तयारी केली आहे. दक्षिण आफ्रिका दुसऱ्या डावात फक्त 212 धावाही केल्या, तरी भारतासमोर 500 धावांचे लक्ष्य उभे राहील. यावरून तुम्ही समजू शकता की दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिका किती मजबूत स्थितीत आहे. भारत ही कसोटी हरला, तर वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलवर त्याचा काय परिणाम होईल?

सध्याच्या वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलकडे पाहिल्यास ऑस्ट्रेलिया आपले सर्व सामने जिंकून पहिल्या स्थानी आहे. WTC पॉइंट्स टेबलमध्ये संघांची रँकिंग धावा आणि विजयांवर आधारित पॉइंट्स टक्केवारीनुसार ठरवली जाते. पहिल्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियाची पॉइंट्स टक्केवारी 100 आहे, तर 66.67 टक्केवारीसह दक्षिण आफ्रिका दुसऱ्या आणि श्रीलंका तिसऱ्या स्थानावर आहेत. भारत सध्या चौथ्या स्थानावर असून त्याची पॉइंट्स टक्केवारी 54.17 आहे.

पाकिस्तान पाचव्या, इंग्लंड सहाव्या आणि बांग्लादेश सातव्या स्थानी आहे. WTC 2025-27 चक्रात वेस्ट इंडिजने आतापर्यंत खेळलेल्या 5ही कसोटीत पराभव स्वीकारला असून ते आठव्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडने या चक्रात अद्याप एकही सामना खेळलेला नाही.

जर भारत दुसरी कसोटीही दक्षिण आफ्रिकेकडून हरला, तर त्याची पॉइंट्स टक्केवारी 48.14 वर घसरेल. याचा थेट फायदा पाकिस्तानला होईल, कारण त्यांची टक्केवारी 50 असून ते पाचव्या स्थानी आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून मालिका हरल्यामुळे भारत पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर सरकून जाईल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका गुवाहाटी कसोटी जिंकल्यास 75 पॉइंट्स टक्केवारीसह आपले दुसरे स्थान अधिक भक्कम करेल.

आता मोठा प्रश्न असा आहे की, भारत WTC फायनलच्या शर्यतीत राहील का? दक्षिण आफ्रिकेकडून मालिका हरल्यानंतर भारताकडे WTC 2025-27 चक्रात अजून 9 कसोट्या उरतील. त्यापैकी 2 मालिका भारताला परदेशात खेळायच्या आहेत. सोपं गणित असं की, भारत या उरलेल्या 9 पैकी 8 कसोट्या जिंकतो, तर त्याची पॉइंट्स टक्केवारी 70 पेक्षा जास्त होईल. गेल्या तीन WTC फायनल पाहता सहभागी संघांची सरासरी पॉइंट्स टक्केवारी 64 ते 68 दरम्यान राहिली आहे. त्यामुळे पुढील 8 कसोट्या जिंकण्यात भारताला यश मिळाल्यास फायनलमध्ये प्रवेश करणे सोपे होईल.

Comments are closed.