'जर भारत वर्ल्ड कप जिंकला, तर आम्ही…' अंतिम फेरीपूर्वी बीसीसीआयने केले मोठे विधान
महिला विश्वचषक 2025चा अंतिम सामना भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघामध्ये रविवारी खेळला जाणार आहे. भारत यापूर्वी दोन वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे, परंतु अजूनपर्यंत एकदाही विजेतेपद जिंकू शकलेला नाही. तर दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश करत आहे. या महामुकाबल्यापूर्वी बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी टीम इंडियाच्या यशाचे श्रेय आयसीसी अध्यक्ष जय शाह यांना दिले आहे, जे यापूर्वी बीसीसीआयचे सचिव होते.
पीटीआयशी बोलताना बीसीसीआयचे सचिव म्हणाले, “जय शाह यांच्या नेतृत्वाखाली, बीसीसीआयने महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी एक ठोस रोडमॅप तयार केला आहे, ज्यामध्ये महिला प्रीमियर लीग (WPL) सुरू करणे आणि आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंमध्ये पगाराची समानता सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे. आमचे उद्दिष्ट नेहमीच महिला क्रिकेटर्सना प्रोत्साहित करणे आणि सशक्त बनवणे राहिले आहे.”
भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच 2005 मध्ये वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, तेव्हा अंतिम सामना जिंकत ऑस्ट्रेलियाची टीम विजेती ठरली होती. दुसऱ्या वेळी, भारतीय संघ 2017 मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचला, जिथे इंग्लंडने विजेतेपद पटकावले. आता भारत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत आहे. बीसीसीआयचे सचिवांनी वचन दिले की टीम इंडिया जिंकली तर साजरा केला जाणारा उत्सव शानदार असेल.
त्यांनी पीटीआयशी बोलताना म्हटले, “जर भारतीय संघ जागतिक चँपियन ठरली, तर आम्ही नक्कीच त्यांच्या विजयाचा उत्सव उत्कृष्ट पद्धतीने साजरा करू.”
Comments are closed.