जर ते नशीब असेल, तर तसे असू द्या.
आपल्याकडे एक उत्तम कार असावी, घर असावे, असे प्रत्येकाला वाटणे हे स्वाभाविक आहे. तथापि, ही फार कमी जणांची ही इच्छा पूर्ण होते. अगदी कष्ट करण्यासाठी तुम्ही सज्ज असला, तरीही या इच्छा पूर्ण होतीलच, याची शाश्वती नसते. अशा स्थितीत एखाद्याला पाच कोटी रुपयांची कार केवळ 100 रुपयांमध्ये लाभली, असे आपल्याला समजले, तर आपला विश्वास बसणे कठीण होईल. पण अशी घटना आपल्याच देशाच्या आसाम राज्यात घडली आहे. येथे पुलकेश काकोती नामक युवकाला 100 रुपयांमध्ये 5 कोटी रुपयांची कार गवसली आहे. आसाममध्ये लॉटरी महोत्सव साजरा केला जातो. याला होली रास महोत्सव असे म्हणतात. त्याचा प्रारंभ 1928 मध्ये केला गेला आहे. तेव्हापासून तो आजपर्यंत प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. या महोत्सवात भगवान श्रीकृष्णाचा रास लीला महोत्सव आणि लॉटरी महोत्सव हे कार्यक्रम एकाच वेळी होतात. या युवकाने या लॉटरी महोत्सवात एक 100 रुपयांचे तिकिट काढले होते. त्यावेळी त्याला आपण इतके भाग्यवान ठरणार आहोत, याची पुसटशी कल्पनाही नव्हती. तथापि, त्याच्या तिकिटाला 5 कोटी रुपये किमतीची लग्झरी लँड रोव्हर डिफेंडर ही कार लागली. त्यामुळे केवळ 100 रुपये खर्चात तो या जगातील सर्वात महागड्या कारपैकी एका कारचा स्वामी झाला आहे. अर्थातच, तो असा एकमेव भाग्यवान आहे, असे म्हणता येणार नाही. या धार्मिक आणि लॉटरी महोत्सवाने गेली 98 वर्षे सातत्याने प्रत्येकवर्षी असे भाग्यवान जन्माला घातले आहेत. या महोत्सवातून अनेकजण आतापर्यंत कोट्याधीश झालेले आहेत. या वर्षीही या लँड रोव्हर डिफेंडर कार सह अन्य अनेक लग्झरी कार लॉटरी महोत्सवात होत्या. अशा एकंदर 21 कार्स जिंकल्या गेल्या आहेत. फॉच्युनर, इनोव्हा, थार, सफारी, सोना या ब्रँडच्या या कार्स आहेत. एकंदर 21 भाग्यवंतांना त्यांचा लाभ झाला आहे, असे दिसून येते.
इतकेच नव्हे, तर या महोत्सवात अन्यही अनेकांना छोट्या मोठ्या देणग्यांचा लाभ झाला आहे. या कार्यक्रमात अनेक प्रकारच्या लॉटऱ्या असल्याने हा महोत्सव आसामसह आसपासच्या अनेक राज्यांमध्ये लोकप्रिय आहे. प्रत्येक वर्षी 30 लाखांहून अधिक लोक 100 रुपयांची तिकिटे काढून आपल्या भाग्याची परीक्षा घेत असतात. त्यांच्यापैकी काहीजण अशा प्रकारे भाग्यवानही ठरत असतात.
Comments are closed.