'श्रेयस अय्यरची भारताच्या टी20 संघात निवड न झाल्यास आंदोलन करू', माजी क्रिकेटपटूचा इशारा

आयपीएल २०२६ मध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत लक्ष वेधले आहे. त्यापैकी एक श्रेयस अय्यर. तो या लीगमध्ये पंजाब किंग्जचे सलग दुसऱ्यांदा नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वातच मागील हंगामात संघ आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम फेरीत दाखल झाला होता. आताच्या १९ व्या हंगामातही संघाने एकही सामना गमावलेला नाही. यामध्ये त्याचे नेतृत्व तर भारीच राहिले असून एक फलंदाज म्हणूनही त्याच्या कामगिरीत सातत्य दिसत आहे, असे असूनही त्याला वारंवार भारताच्या टी२० संघात निवडण्यासाठी दुर्लक्ष केले जात आहे. त्याची संघात निवड व्हावी आणि तसे झाले नाही तर आम्ही आंदोलन करु, असे माजी भारतीय क्रिकेटपटूने जाहीर केले आहे.

सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये श्रेयस प्रभावी कामगिरी करत असून त्याच्या भारताच्या टी२० संघातील स्थानाबद्दलची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावेळी माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी याने श्रेयसला राष्ट्रीय टी२० संघात निवडण्याचे समर्थन केले आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणे सुरूच ठेवले तर आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे.

तिवारी क्रिकबजच्या यूट्युबवरील एका कार्यक्रमात बोलता होता. त्यामध्ये तो म्हणाला, “श्रेयसने आपल्या फलंदाजीत उत्तम संयम दाखवला आहे. यानंतरही त्याची भारताच्या टी२० संघात निवड नाही झाली तर आम्ही आंदोलन करू, त्याच्यासाठी लढू. त्याला जे मिळायला हवे ते मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करु.”

“विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्ती घेतली आहे. यामुळे भारताला एका अशा खेळाडूची आवश्यकता आहे, जो पूर्ण नियंत्रण दाखवून संघाला विजय मिळवून देईल. भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकून देण्यात मदत करेल. श्रेयसची लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजी उत्तम आहे”, असेही तिवारीने पुढे म्हटले आहे.

तिवारीच्या या वक्तव्याला विरेंद्र सेहवाग यानेही पाठिंबा दर्शविला आहे. सेहवाग म्हणाला, “श्रेयसने आपल्या संघासाठी सामना जिंकून दिला आहे. मागच्या सामन्यातही त्याने अशीच कामगिरी केली होती. तो बऱ्याच काळापासून असे करत आहे. मला आश्चर्य वाटते की त्याला भारताच्या विश्वचषकात स्थान मिळाले नाही. त्याने आयपीएलच्या मागील हंगामातही चांगली कामगिरी केली होती आणि पंजाब किंग्ज अंतिम फेरीत पोहोचला होता. मला आशा आहे की त्याची पुढच्या टी२० विश्वचषकासाठी भारताच्या संघात निवड होईल.”

श्रेयसने आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत ४ सामन्यांत ६८.५० च्या सरासरी आणि १८७.६७ च्या स्ट्राईक रेटने १३७ धावा केल्या आहेत. त्याने नुकत्याच झालेल्या सनरायझर्स हैद्राबादविरुद्धच्या सामन्यात २२० धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ३३ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या होत्या.

Comments are closed.