मुंबई पोलीस दिल्ली पोलिसांसारखे वागणार असतील तर…! आदित्य ठाकरे यांनी दिला इशारा
मुंबई पोलिसांचे आम्ही नेहमी कौतुक करत आलो आहोत. पण मुंबई पोलीस दिल्ली पोलिसांसारखे वागणार असतील तर मुंबईमध्ये प्रत्येक रस्त्यावर शिवसैनिक, मनसैनिक रस्त्यावर उतरेल, संपूर्ण महाराष्ट्र आता शांत बसणार नाही. त्याला कारणीभूत स्थानिक पोलिसांच्या अशा वागणुकीमुळे होईल, अशी आक्रमक आणि स्पष्ट भूमिका शिवसेना, युवासेना प्रमुख, आमदारआदित्य ठाकरे यांनी मांडली.
मुंबईतील दादर येथील शिवसेनाभवनाबाहेर रविवारी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी युवा सेनेकडून आंदोलनाची तयारी सुरू असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. यावेळी पोलिसांनी शिवसेनाभवनात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू सेनाभवनाबाहेर येताच, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शिवसैनिकांना सोडवण्यासाठी हस्तक्षेप केला. आदित्य ठाकरे यांनी पोलिसांची गाडी अडवून आंदोलकांची सुटका होईपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनाभवनाबाहेरील तणाव आणखी वाढला.
Comments are closed.