मतांची चोरी झाली नाही तर महाआघाडीचे सरकार येईल.

सर्कल/ किशनगंज

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी रविवारी बिहारच्या किशनगंज येथे सभेला संबोधित केले. यादरम्यान त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य करत द्वेष फैलावणे आणि वोटचोरीचा आरोप केला. भारतात दोन विचारसरणींची लढाई सुरू आहे, एकीकडे संघ असून तो देशाला जात, धर्म, क्षेत्र, भाष आणि लिंगाच्या आधारावर विभागू पाहत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्ष आणि आमची महाआघाडी आहे, जी प्रत्येक धर्म आणि समुदायाच्या लोकांना एकत्र आणत देशाला एकजूट करू पाहत असल्याचे वक्तव्य राहुल यांनी केले आहे.

भारत जोडो यात्रेदरम्यान मी 4 हजार किलोमीटरची यात्रा ‘द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान’ सुरू करण्याच्या संदेशासह केली होती. भाजप अन् संघाची यात्रा द्वेष फैलावते, तर आमची यात्रा प्रेमाचा फैलाव करणारी आहे. द्वेष पंतप्रधान नरेंद्र मोदींची विचारसरणी अन् रक्तात आहे, ते फूट पाडून शत्रुत्व निर्माण करू पाहत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी मी हरियाणावरून पत्रकार परिषद घेतली होती, यात कशाप्रकारे ‘हायड्रोजन बॉम्ब’ फुटला होता हे लोकांनी पाहिले. पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त मते चोरण्यासाठी संगनमत करत असल्याचा स्पष्ट आरोप मी केला होता, परंतु मोदींनी यावर कुठलेच उत्तर दिले नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

हरियाणात दोन कोटी मतदार आहेत, परंतु निवडणुकीत 25 लाख बनावट मते घातली गेली. तेथील मतदारयादीत ब्राझील मॉडेलची छायाचित्रेही मिळाली आहेत. जर वोटचोरी रोखण्यात आली तर बिहारमध्ये 100 टक्के महाआघाडीचे सरकार सत्तेवर येणार असा दावा राहुल यांनी केला आहे.

रोजगाराचा मुद्दा

युवांना रोजगार द्यायचा असल्यास शाळा-महाविद्यालयांशिवाय हे शक्य नाही. बिहारमध्ये या संस्थाच विकल्या जात आहेत. बिहारचे लोक देशभरात काम करतात, परंतु त्यांना बिहारमध्ये काम मिळत नाही. नितीश कुमार हे बिहारच्या युवांसाठी रोजगार इच्छित नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

Comments are closed.