कायम खेळायचेय तर हुजरेगिरी करा! राणा-रेड्डीच्या निवडीवर श्रीकांत यांची टीका

सध्या संघात फक्त एकच खेळाडू स्थिर आहे तो म्हणजे हर्षित राणा. बाकी सर्व खेळाडू येतात आणि जातात, पण तो फेव्हिकॉलच्या मजबूत जोडसारखा टीम इंडिया चिटकून बसला आहे. त्याची कामगिरी कशी आहे, याची सर्वांना कल्पना आहे. पण संघात कायम राहण्यासाठी संघ प्रशिक्षक गौतम गंभीर यांची हुजरेगिरी करण्याची शैली जमल्याची जोरदार टीका हिंदुस्थानी संघाचे माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी केली.
नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बेधडक फलंदाज आणि माजी कर्णधार श्रीकांत पुन्हा एकदा टीम इंडियाच्या निवड समितीवर तुटून पडलेत. त्यांनी आपल्या ‘यूटय़ूब’ चॅनलवर केलेल्या विश्लेषणात थेट हर्षित राणाच्या निवडीवर ताशेरे ओढले आहेत. संघात मोठय़ा प्रमाणात पक्षपात आणि वशिलेबाजी सुरू असल्याचे मत त्यांनी बोलून दाखवलेय. हर्षित राणाची कामगिरी किती प्रभावी आहे, ते सर्वांनी पाहावे. पण हा खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघात कायम आहे. तो संघात कायम का आहे, याची कुणालाही कल्पना नाही. त्याला बीसीसीआयकडून टीम इंडिया आयुष्यभराचा पास मिळालाय, असे वाटतेय. सर्व खेळाडू संघात येतात आणि बाहेर जातात, पण राणा मात्र टीमच्या फोटोमध्ये कायम उभा दिसतो. उत्कृष्ट कामगिरी करणारे बाहेर बसतात आणि सरासरी कामगिरी करणारे दरवेळी संघात. कदाचित निवडीचे रहस्य एवढेच, गंभीरजींनी काय म्हटले की त्यावर ‘जी हुजूर’ म्हणत राहा. त्यांची हुजरेगिरी करत राहा. हे राणाला कळले असावे.
श्रीकांत यांनी टीम इंडियाच्या या निवडीला इशाराही दिला. ते म्हणाले, असाच पक्षपातीपणा सुरू राहिला तर 2027 च्या वर्ल्ड कप तयारीला कमकुवत करू शकतो. अशी निवड सुरू राहिली आणि राणा आणि रेड्डीला संघात असेच स्थान मिळत राहिले तर 2027 चा वर्ल्ड कप आताच विसरा. जो चांगली कामगिरी करतो त्याची निवड करण्याचे कर्तव्य निवड समितीचे आहे. आपल्या संबंधांचे किंवा नात्यांची निवड इथे नको व्हायला, असाही प्रहार श्रीकांत यांनी केला.
Comments are closed.