तुम्ही पराभवाचे हकदार..’ टीम इंडियाच्या पराभवावर मायकेल वॉनचं स्पष्ट मत, गौतम गंभीर यांना दर्शवला विरोध

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील (IND vs SA) पहिला कसोटी सामना फक्त दीड दिवसातच संपला. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मात्र भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी खेळपट्टी आणि क्यूरेटरचे समर्थन केले. पण मायकल वॉन यांनी याच्या उलट विधान केले. दुसऱ्या दिवशीच्या खेळादरम्यान वॉन यांनी या पिचला ‘घटिया पिच’ असे म्हटले होते. कोलकाता कसोटीमध्ये तिसऱ्या दिवशी भारत 124 धावांचे छोटे लक्ष्यही गाठू शकला नाही.

आता मायकल वॉन यांनी पुन्हा एकदा ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर टीका केली आहे. त्यांनी X वर पोस्ट करत लिहिले, अशी खेळपट्टी तयार कराल तर तुम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सकडून हरायलाच पाहिजे. दक्षिण आफ्रिकेचा उत्कृष्ट विजय.

पहिल्या श्रेणीच्या क्रिकेटमध्ये हजाराहून जास्त विकेट घेणाऱ्या सायमन हार्मरने एकहाती भारतीय संघावर वर्चस्व गाजवले. त्याने संपूर्ण सामन्यात 8 विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात त्याने भारताच्या मिडल ऑर्डरला अक्षरशः गुडघ्यावर आणले. ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या त्याने विकेट्स घेतल्या.

कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी एकूण 15 विकेट पडल्या. भारतीय कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) मानेला ताण आल्यामुळे रिटायर्ड हर्ट झाले. त्या दिवशी स्पिनर्सचाच दबदबा होता. या पार्श्वभूमीवर मायकल वॉन यांनी पिचला ‘खराब पिच’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

दक्षिण आफ्रिकेने भारतात शेवटचा कसोटी सामना 2010 मध्ये जिंकला होता. तब्बल 15 वर्षांनी टेंबा बावुमाच्या (Temba Bavuma) नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने भारतीय भूमीवर कसोटी विजय मिळवला. बावुमाच्या कर्णधारकीत आजवर दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यांत अजूनही अपराजित आहे.
दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाईल.

Comments are closed.