इफ्फी 2026 मध्ये ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’चा समारोप; ‘वन लास्ट स्टॉप’ सर्वोत्कृष्ट चित्रपट, मोहक गांधी ठरले विजेते – TMarathiNews
पणजी : गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) युवा चित्रपट निर्मात्यांच्या कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ (CMOT) या उपक्रमाचा समारोप झाला. यंदाच्या उपक्रमात देशभरातील 100 तरुण प्रतिभावंतांनी सहभाग घेतला. अवघ्या 48 तासांत चित्रपटाची संकल्पना विकसित करण्यापासून ते चित्रीकरण आणि अंतिम सादरीकरणापर्यंतचा प्रवास पूर्ण करण्याचे आव्हान या स्पर्धकांसमोर होते. या आव्हानात मोहक गांधी दिग्दर्शित ‘वन लास्ट स्टॉप’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावत 5 लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले. तर तमन्ना ठाकूर दिग्दर्शित ‘अ लिटल समथिंग’ या चित्रपटाला उपविजेतेपद आणि 3 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले.
समारोप सोहळ्याला 57 व्या इफ्फीचे महोत्सव संचालक आणि चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (NFDC) व्यवस्थापकीय संचालक आणि भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (FTII) कुलगुरू धीरज सिंग यांच्यासह परीक्षक समितीचे सदस्य उपस्थित होते. ग्रेट ग्रँड ज्युरीमध्ये एमी बारुआ, प्रेमराज, मधु अप्सरा, रुमी जाफरी आणि मेधा खर्डेकर रेड्डी यांचा समावेश होता.
15 विभागांमध्ये उत्कृष्ट प्रतिभांचा गौरव
यंदाच्या सीएमओटी उपक्रमात पाच संघांनी तयार केलेल्या लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले. यासोबतच चित्रपट निर्मितीच्या विविध 15 विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रतिभावंतांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
‘वन लास्ट स्टॉप’साठी मोहक गांधी यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. ‘अ लिटल समथिंग’साठी तमन्ना ठाकूर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. ‘शेल्स’ या चित्रपटातील अभिनयासाठी सिद्धी पारकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
छायाचित्रण विभागात ‘वन लास्ट स्टॉप’साठी त्रियाशा मन्ना, तर संकलन विभागात ‘अ लिटल समथिंग’साठी नयन चोटलिया आणि मानव अग्रवाल यांना पुरस्कार मिळाला. ‘शेल्स’साठी जितिन एस यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखकाचा पुरस्कार मिळाला. ‘टू सनसेट्स अँड झिरो सनराइझेस’साठी अश्विन अशोक यांना सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखनाचा पुरस्कार देण्यात आला.
‘शेल्स’ चित्रपटासाठी श्री पार्वती एस यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा, तर ‘नील मछली’साठी अक्षय अनमोल कटोरे यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला. वेशभूषा आणि कला दिग्दर्शन या दोन्ही विभागांत ‘वन लास्ट स्टॉप’साठी सृष्टी वाघ आणि रूपालिका पॉल यांना गौरविण्यात आले.
केशभूषा आणि रंगभूषा विभागात ‘शेल्स’साठी कशिश जयस्वाल, अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स विभागात ‘नील मछली’साठी हर्ष साहनी आणि प्रकाश कुमार मेहता, तर पार्श्वनिवेदन आणि डबिंग विभागात ‘अ लिटल समथिंग’साठी सुदेक्षा सरकार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
48 तासांत पाच संघांनी साकारले लघुपट
सीएमओटी चित्रपट निर्मितीचे आव्हान 21 नोव्हेंबर रोजी सुरू झाले होते. यामध्ये सहभागी झालेल्या 100 तरुणांची प्रत्येकी 20 सदस्य असलेल्या पाच संघांमध्ये विभागणी करण्यात आली होती. लाल, हिरवा, निळा, पिवळा आणि बेज अशा रंगांनी या संघांची ओळख निश्चित करण्यात आली होती.
‘रूट्स अँड विंग्स : ऑनरिंग अवर रूट्स, एम्ब्रेसिंग अवर फ्युचर’ या संकल्पनेवर आधारित लघुपट अवघ्या ४८ तासांत तयार करण्याचे आव्हान प्रत्येक संघाला देण्यात आले होते. दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, संकलन, ध्वनी संयोजन, पटकथालेखन, कला दिग्दर्शन, अॅनिमेशन, संगीत, पार्श्वगायन, केशरचना, रंगभूषा आणि वेशभूषा अशा चित्रपट निर्मितीच्या विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांनी एकत्र येत हे आव्हान पूर्ण केले.
गोव्यातील विविध ठिकाणी चित्रीकरण केल्यानंतर सर्व संघांनी कला अकादमी येथील विशेष पोस्ट-प्रॉडक्शन केंद्रात चित्रपटांच्या अंतिम कामाला सुरुवात केली. मर्यादित वेळेत संकलन, ध्वनी मिश्रण आणि दृश्यांवरील अंतिम प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहभागी तरुणांनी अहोरात्र मेहनत घेतली. या उपक्रमातून त्यांच्या सर्जनशीलतेसोबतच सांघिक काम करण्याची क्षमता आणि वेळेचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्यही दिसून आले.
‘सीएमओटी’ युवा प्रतिभा आणि चित्रपटसृष्टीतील दुवा : प्रभात
समारोप सोहळ्यात सहभागींचे अभिनंदन करताना अतिरिक्त सचिव प्रभात यांनी ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ हा उपक्रम उदयोन्मुख प्रतिभा आणि चित्रपटसृष्टी यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगितले. या मंचामुळे युवा चित्रपट निर्मात्यांना आपली क्षमता सिद्ध करण्यासोबतच चित्रपट क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिकांशी संपर्क साधण्याची संधी मिळते, असे त्यांनी नमूद केले.
‘रूट्स अँड विंग्स : ऑनरिंग अवर रूट्स, एम्ब्रेसिंग अवर फ्युचर’ या यंदाच्या संकल्पनेचा उल्लेख करत त्यांनी सांस्कृतिक वारसा, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान यांचा संगम अधोरेखित केला. तसेच अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC-XR) क्षेत्रात निर्माण होत असलेल्या नव्या संधी तरुणांसाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
चित्रपट निर्मिती ही सांघिक प्रक्रिया : आशुतोष गोवारीकर
महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर यांनी सर्व सहभागी संघांचे अभिनंदन केले. चित्रपट निर्मिती ही एका व्यक्तीची नव्हे, तर अनेक सर्जनशील विभागांच्या एकत्रित प्रयत्नांतून साकार होणारी सांघिक प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमादरम्यान निर्माण झालेली मैत्री आणि सहकार्याची भावना पुढेही कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी युवा चित्रपट निर्मात्यांना केले. एकमेकांशी संपर्कात राहून संघ म्हणून काम सुरू ठेवण्याचा सल्ला देत सीएमओटी हा त्यांच्या चित्रपट प्रवासाचा केवळ प्रारंभ असल्याचे त्यांनी सांगितले.
2021 पासून युवा प्रतिभेला व्यासपीठ
2021 मध्ये सुरू झालेला ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ हा उपक्रम अल्पावधीतच माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख व्यावसायिकांसाठी महत्त्वाचा मंच बनला आहे. या उपक्रमातील माजी सहभागी आंतरराष्ट्रीय निर्मिती संस्थांमध्ये काम करत असून, कान्स, बर्लिन आणि टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसह आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांसारख्या प्रतिष्ठित मंचांवरही त्यांनी आपली छाप उमटवली आहे.
मागील आवृत्तीत मुकेश छाबरा कास्टिंग कंपनीने (MCCC) 18 सहभागींची निवड केली होती. त्यामुळे युवा प्रतिभावंतांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यात या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेने (FTII) राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (NFDC) सहकार्याने या उपक्रमाचे संकल्पन, नियोजन आणि आयोजन केले. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान एफटीआयआयच्या प्राध्यापकांनी सहभागी तरुणांना मार्गदर्शन केले. तर एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) यांनी राज्यातील विविध ठिकाणी चित्रीकरणासाठी आवश्यक परवानग्या आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या.
Comments are closed.