भारतीय चित्रपटसृष्टीतील विविधतेचे दर्शन घडविणारा ‘इंडियन पॅनोरमा’ : मधुर भांडारकर – TMarathiNews

पणजी : भारतीय चित्रपटसृष्टीची खरी ताकद देशातील विविध भाषा, संस्कृती आणि वेगवेगळ्या कथांमध्ये आहे. प्रादेशिक अस्मिता आणि चित्रपटांच्या शैली वेगवेगळ्या असल्या, तरी त्यातील मानवी भावना प्रेक्षकांना एकत्र जोडतात, असे मत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि इंडियन पॅनोरमा 2026 फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष मधुर भांडारकर यांनी व्यक्त केले.

गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI-2026) निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी 404 चित्रपटांच्या प्रवेशिकांमधून 25 चित्रपटांची निवड करण्याच्या प्रक्रियेचा अनुभव सांगितला. या निवड प्रक्रियेत विविध चित्रपट प्रकार, विषय आणि प्रादेशिक कथांचा विचार करण्यात आला. ज्युरीने एकमताने चित्रपटांची निवड केली असून अंतिम निवडीबाबत आपण समाधानी असल्याचे भांडारकर यांनी सांगितले. विशेषतः काही मराठी, लडाखी आणि मल्याळम चित्रपटांनी ज्युरीवर विशेष छाप पाडल्याचेही त्यांनी नमूद केले.

ज्येष्ठ स्तंभलेखिका आणि ज्युरी सदस्य भारती प्रधान यांनी चित्रपटांच्या निवडीत मूळ संकल्पना आणि देशातील विविध भागांचे प्रतिनिधित्व यांना महत्त्व दिल्याचे सांगितले. इंडियन पॅनोरमा विभागात देशाच्या विविध भागांतील चित्रपटांना स्थान मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्य प्रवाहातील चित्रपट आणि इंडियन पॅनोरमा फीचर फिल्म विभागातील चित्रपट निवडीचे निकष वेगवेगळे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अभिनेत्री आणि ज्युरी सदस्य बिंदू चंद्रमौली यांनी विविध भाषांतील चित्रपट पाहण्याचा अनुभव आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहण्यासारखा असल्याचे सांगितले. भाषा, शैली आणि कथानक वेगवेगळे असले तरी त्यामागील भावना समान असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रेक्षकांनी केवळ आपल्या भाषेतील चित्रपटांपुरते मर्यादित न राहता इतर भाषांतील चित्रपटही पाहावेत, असे आवाहन त्यांनी केले.

छायाचित्रकार आणि ज्युरी सदस्य एम. एस. प्रभू यांनी हा अनुभव म्हणजे भारताच्या विविध भागांचा आभासी प्रवास असल्याचे सांगितले. विविध प्रदेशांतील चित्रपट पाहताना त्यांच्यातील भावनिक समानता आणि सांस्कृतिक संबंध जाणवल्याचे त्यांनी नमूद केले. नवोदित दिग्दर्शकांच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. तर छायाचित्रकार के. एस. शिवरामन यांनी काही चित्रपटांमधील प्रभावी भावना आणि कथानक दक्षिण भारतीय प्रेक्षकांसाठीही आकर्षक ठरू शकते, असे मत व्यक्त केले. ज्युरी सदस्य सोहम पी. शाह यांनी चित्रपटांचा संदेश हा निवडीतील महत्त्वाचा निकष असल्याचे सांगितले.

इंडियन पॅनोरमा 2026 अंतर्गत फीचर फिल्म विभागात 20 चित्रपटांची, तर मुख्य प्रवाहातील चित्रपट विभागात पाच चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. आदित्य धर दिग्दर्शित हिंदी चित्रपट ‘धुरंधर’ची इंडियन पॅनोरमाच्या उद्घाटनाच्या चित्रपटासाठी निवड करण्यात आली आहे. याशिवाय इंडियन पॅनोरमा विभागात 20 बिगर-फीचर चित्रपटांचाही समावेश आहे.

या पत्रकार परिषदेत ज्युरी सदस्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रादेशिक विविधता, नव्या दिग्दर्शकांचे योगदान आणि विविध भाषांमधील कथांना मिळणारे व्यासपीठ यावर आपली मते मांडली. भारतीय चित्रपटसृष्टीतील विविध भाषा आणि संस्कृतींना एकत्र आणत दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व इंडियन पॅनोरमाच्या माध्यमातून अधोरेखित होत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन राजित चंद्रन यांनी केले.

Comments are closed.