खलनायक हा अनेकदा समाजाच्या मानसिकतेचे प्रतिबिंब : कार्तिक सुब्बराज – TMarathiNews

पणजी : खलनायक हा नेहमीच एखादी व्यक्ती नसतो, तर तो समाजातील विचारसरणी आणि मानसिकतेचे प्रतिबिंब असू शकतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट निर्माते कार्तिक सुब्बराज यांनी केले. गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ‘व्हॉट इफ द व्हिलन इज राइट?’ या विषयावरील संवाद सत्रात ते बोलत होते.

मानवी वर्तन हे परिस्थिती, सामाजिक अनुभव आणि व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या लोकांमुळे घडत असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे चांगले किंवा वाईट ठरविणे सोपे नसल्याचे सुब्बराज यांनी सांगितले. त्यांच्या चित्रपटांमध्ये नायक आणि खलनायक यांच्या पारंपरिक चौकटींना प्रश्न विचारत व्यक्तिरेखांच्या वर्तनामागील सामाजिक कारणांचा शोध घेतला जातो.

‘डॉरोथी’ या चित्रपटाविषयी बोलताना त्यांनी जाणीवपूर्वक वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तिरेखा आणि सामाजिक संस्कारांमुळे स्वतःच्या पूर्वग्रहांची जाणीव नसलेल्या व्यक्तिरेखा यांतील फरक स्पष्ट केला. चित्रपटात एखाद्या व्यक्तीपेक्षा पुरुषप्रधान मानसिकता आणि सामाजिक दबाव हेच खरे खलनायक असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘मर्क्युरी’ चित्रपटातही एका गावाच्या सामूहिक मानसिकतेतून नकारात्मक प्रवृत्तींचे चित्रण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

एखाद्याच्या अडचणींची थट्टा करणे हे साध्या रागावण्यापेक्षा अधिक वेदनादायक ठरू शकते, असे सुब्बराज म्हणाले. चुकीच्या कृत्यांनंतरची अपराधी भावना आणि पश्चात्ताप हेदेखील शिक्षेचे स्वरूप असू शकते. चित्रपटातील परिणाम दाखविण्यासाठी शारीरिक हिंसा किंवा मृत्यू हेच एकमेव मार्ग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘डॉरोथी’ला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादाचाही त्यांनी उल्लेख केला. चित्रपट पाहिल्यानंतर काही प्रेक्षकांनी तृतीयपंथीयांप्रती आपुलकी व्यक्त केली, तर काही पुरुष भावूक झाल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रतिक्रियांमुळे चित्रपट हे मनोरंजनाबरोबरच सहानुभूती निर्माण करणारे आणि सामाजिक बदलाला चालना देणारे माध्यम असल्याचा विश्वास दृढ झाल्याचे ते म्हणाले. ‘जिगरठंडा’च्या निर्मितीमागेही कथाकथनातून बदल घडविण्याची हीच भूमिका होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

इफ्फीच्या ‘स्टोरीज विदाउट बॉर्डर्स’ या संकल्पनेशी त्यांच्या चित्रपटांची भूमिका सुसंगत असल्याचेही या चर्चेतून अधोरेखित झाले. सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ वेगवेगळे असले, तरी नैतिकता, मानवी वर्तन आणि सहानुभूती यांवरील प्रश्न सर्वत्र समान असल्याचे सुब्बराज यांनी नमूद केले.

चित्रपट समीक्षक सुधीर श्रीनिवासन यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

Comments are closed.