सीमारेषांमुळे तुटलेल्या नात्यांची कथा ‘स्कायलार्क’मधून उलगडली; इफ्फीतील आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात किर्गिझ चित्रपटाचा भारतातील प्रीमियर – TMarathiNews

पणजी : सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर मध्य आशियात आखल्या गेलेल्या नव्या सीमांमुळे शतकानुशतके एकत्र राहिलेल्या समुदायांची झालेली विभागणी आणि त्यातून सामान्य माणसाला सहन करावा लागणारा भावनिक आघात ‘स्कायलार्क’ या किर्गिझ चित्रपटातून मांडण्यात आला आहे. गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी) आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात या चित्रपटाचा भारतातील प्रीमियर झाला.

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर गोव्यात पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका नार्गिझा डोतिएव्हा व निर्मात्या गुलनारा कासमाम्बेतोव्हा यांनी चित्रपटाच्या निर्मितीमागील प्रेरणा, वास्तव घटनांचा संदर्भ आणि भारतीय चित्रपटांशी असलेल्या आपल्या भावनिक नात्याविषयी माहिती दिली.

‘स्कायलार्क’ हा 85 मिनिटांचा चित्रपट किर्गिझस्तान आणि ताजिकिस्तान यांच्या सीमाभागातील वास्तव घटना व वृत्तपत्रांतील बातम्यांवर आधारित आहे. नव्याने निश्चित झालेल्या सीमांमुळे अनेक पिढ्यांपासून एकत्र राहणारे समुदाय एकमेकांपासून दुरावले. याच पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा आकार घेते.

आइबेक नावाचा किशोर आपल्या आजीसोबत वाढत असतो. आजीच्या निधनानंतर तिच्या अंतिम इच्छेची पूर्तता करण्याचे आव्हान त्याच्यासमोर उभे राहते. आपल्या पतीच्या शेजारी दफन केले जावे, अशी तिची इच्छा असते. मात्र, ते स्मशान आता ताजिकिस्तानच्या हद्दीत असते. आजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी आइबेकला सीमारेषा आणि त्यातून निर्माण झालेल्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो.

दिग्दर्शिका डोतिएव्हा यांनी सांगितले की, सीमाभागात घडलेल्या घटनांमधूनच चित्रपटाची प्रेरणा मिळाली. निर्मात्या कासमाम्बेतोव्हा यांनी बातकेन प्रदेशातील बदलांचा उल्लेख केला. पूर्वी परिचित असलेली चराऊ कुरणे आणि पूर्वजांची दफनभूमी नव्या सीमांमुळे प्रतिबंधित क्षेत्रे बनली. या बदलांचा स्थानिक लोकांच्या जीवनावर झालेला परिणाम चित्रपटातून मांडण्यात आला आहे.

किर्गिझ लोककथांमध्ये मेंढीच्या पाठीवर शांतपणे घरटे बांधणारा स्कायलार्क पक्षी शांतता आणि सौहार्दाचे प्रतीक मानला जातो. संघर्षाच्या परिस्थितीतही माणसाची जगण्याची उमेद आणि नात्यांचे महत्त्व कायम राहते, हा संदेश या प्रतीकातून अधोरेखित करण्यात आला आहे. मध्य आशियातील मौखिक कथाकथन परंपरा आणि आधुनिक चित्रपटशैलीचा संगम असलेल्या ‘स्कायलार्क’ने 2026 च्या अमूर ऑटम फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्कार पटकावला आहे.

पत्रकार परिषदेत चित्रपट निर्मात्यांनी भारतीय चित्रपटांविषयीच्या आठवणींनाही उजाळा दिला. सोव्हिएत काळातील किर्गिझस्तानमध्ये भारतीय चित्रपटांना विशेष स्थान होते. कुटुंबासोबत हिंदी चित्रपट पाहणे, परिसरातील मुलांसोबत गाणी म्हणणे आणि ‘डिस्को डान्सर’मधील मिथुन चक्रवर्ती यांच्या नृत्यशैलीचे अनुकरण करणे, या बालपणीच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.

राज कपूर यांच्या चित्रपटांपासून अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांपर्यंत भारतीय सिनेमाने अनेक पिढ्यांच्या भावविश्वावर प्रभाव टाकल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय चित्रपटांतील भावनिक अभिव्यक्ती, प्रभावी कथाकथन आणि मानवी नात्यांचे चित्रण यामुळे किर्गिझस्तानमधील प्रेक्षकांना त्यांच्याशी विशेष जवळीक वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन ब्रिंदा रणदीप सुदान यांनी केले.

Comments are closed.