इफ्फीच्या वेव्हज चित्रपट बाजारात 14 करार अंतिम टप्प्यात; 54 देशांतील 2,288 प्रतिनिधींचा सहभाग – TMarathiNews
पणजी : 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) अनुषंगाने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळातर्फे (एनएफडीसी) आयोजित वेव्हज चित्रपट बाजाराच्या 20 व्या वर्षाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. जगातील 54 देशांमधून आलेले 2,288 प्रतिनिधी आणि 471 खरेदीदारांच्या सहभागामुळे या बाजाराने भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील सहकार्याला नवी चालना दिली. पाच दिवसांच्या या बाजारात झालेल्या व्यावसायिक चर्चांमधून 14 सामंजस्य करार आणि इतर करार अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. भारत-चिली सहनिर्मितीसाठी दोन स्वारस्यपत्रांवरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
पत्रसूचना कार्यालयाने (पीआयबी) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे अतिरिक्त सचिव प्रभात यांनी ही माहिती दिली. यावेळी इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंग आणि वेव्हज चित्रपट बाजाराचे विशेष कर्तव्य अधिकारी श्रीराग एम. उपस्थित होते.
25 प्रकल्प, 220 व्यावसायिक बैठका
सहनिर्मिती बाजारात आठ देशांतील 25 प्रकल्प सहभागी झाले. या प्रकल्पांनी 13 भारतीय भाषांसह एकूण 16 भाषांचे प्रतिनिधित्व केले. प्रकल्पांना निर्माते, गुंतवणूकदार आणि चित्रपट उद्योगातील प्रतिनिधींशी जोडण्यासाठी सुमारे 220 प्रत्यक्ष बीटूबी बैठका आयोजित करण्यात आल्या.
निवड झालेल्या चित्रपट प्रकल्पांपैकी ‘हुर्डा (दॅट टाईट ग्रीन टॉप)’ या प्रकल्पाची निर्मिती करण्याची जबाबदारी खान अँड कुमार मिडिया या कंपनीने स्वीकारली आहे.
चित्रपट प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ
सहनिर्मिती बाजार, पटकथालेखकांची प्रयोगशाळा, प्रगतिपथावरील प्रकल्पांची प्रयोगशाळा आणि ‘व्ह्यूइंग रूम’ यांच्या माध्यमातून विविध टप्प्यांवरील चित्रपटांना पाठबळ देण्यात आले.
‘व्ह्यूइंग रूम’साठी 170 प्रकल्पांचे अर्ज प्राप्त झाले होते. या विभागात 608 अभ्यागतांनी सुमारे 100 तासांमध्ये 155 चित्रपट पाहिले. या प्रकल्पांमधून 11 देशांचे आणि विविध भाषांचे प्रतिनिधित्व झाले.
बंगळुरू आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवातील प्रदर्शनासाठी ‘व्ह्यूइंग रूम’मधून चार लघुपट निवडले जाणार आहेत. पॅनोरमा स्टुडिओजकडून चित्रपटगृह वितरण, विमानातील मनोरंजन आणि चित्रपटगृहांव्यतिरिक्त प्रदर्शनाच्या हक्कांसाठी काही प्रकल्पांचा विचार सुरू आहे.
‘वर्क-इन-प्रोग्रेस लॅब’साठी प्राप्त 53 प्रवेशिकांमधून पाच प्रकल्प निवडण्यात आले. प्रत्येक प्रकल्पाला चित्रपट उद्योगातील अनुभवी मार्गदर्शकांसोबत तीन मार्गदर्शन सत्रांचा लाभ मिळाला.
विविध चित्रपटांना अनुदान आणि पुरस्कार
वेव्हज चित्रपट बाजारात चित्रपटांना आर्थिक अनुदान, वितरणाच्या संधी, कलाकार निवड सेवा आणि पोस्ट-प्रॉडक्शन सहाय्य देण्यात आले.
एनएफडीसीच्या रोख अनुदानांतर्गत गरिमा पुरा दिग्दर्शित ‘नोज बोन’ या चित्रपटाला 10 हजार अमेरिकी डॉलर, तर रिधम जानेवे दिग्दर्शित ‘गुडबाय मिस्टर डी’मेलो’ आणि श्रीमयी सिंग दिग्दर्शित ‘फायरफ्लॉवर्स’ या चित्रपटांना प्रत्येकी पाच हजार अमेरिकी डॉलरचे अनुदान मिळाले.
कुशल किशोर आणि कुशाग्र किशोर दिग्दर्शित ‘अँड ऑन दॅट डे…’ या चित्रपटाला रिबॉर्न इंडिया फिल्मचे एक लाख रुपयांचे अनुदान मिळाले. ‘गुडबाय मिस्टर डी’मेलो’ला मुकेश छाबरा कास्टिंग पुरस्कारांतर्गत विनामूल्य कलाकार निवड सेवेचे साहाय्य मिळाले.
आदित्य वेंपत्ती दिग्दर्शित ‘नाधी’ला प्रसाद कॉर्पोरेशन पोस्ट-प्रॉडक्शन पुरस्कार, तर अजित वेलायुधन दिग्दर्शित ‘आट्टुमली (बाय द रिव्हर)’ला मिका क्रिएटिव्ह फेलोशिप प्रदान करण्यात आली. ‘आराम नगर’, ‘कारेन्ग’ आणि ‘चकाचौंध’ या चित्रपटांना मुव्हीबफ पोस्ट-प्रॉडक्शन पुरस्कार मिळाले. मनीष सैनी दिग्दर्शित ‘भाई बँड (वन टू थ्री माइक चेक)’ला रिबॉर्न इंडिया फिल्म वितरण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वर्क-इन-प्रोग्रेस लॅबमध्ये ‘द गार्डन ऑफ अस’ला प्रसाद कॉर्पोरेशन पोस्ट-प्रॉडक्शन आणि आयआयसीटी वर्क-इन-प्रोग्रेस लॅब पुरस्कार मिळाले. ‘आट्टुमली’ला न्यूब स्टुडिओ पोस्ट-प्रॉडक्शन पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘फॅमिली मॅटर’, ‘साजा (द ब्लॅकस्टोन रेशो)’ आणि ‘व्हेअर हॅज द रिव्हर गॉन’ या चित्रपटांचा विशेष उल्लेख करण्यात आला.
12 राज्यांचे, चार देशांचे पॅव्हिलियन्स
चित्रपट बाजारात 12 राज्यांचे आणि चार देशांचे पॅव्हिलियन्स उभारण्यात आले होते. रशिया भागीदार देश म्हणून सहभागी झाला होता. एकूण 22 व्यावसायिक दालने या बाजारात होती.
तंत्रज्ञान विभागात नेटफ्लिक्स आणि डॉल्फिन एआय यांसारख्या कंपन्यांचा सहभाग होता. डॉल्फिन एआयने बाजारपेठेत आपल्या एआय स्टुडिओचा प्रारंभ केला.
वेव्हएक्स स्टार्टअप प्रदर्शनात प्रसारमाध्यमे, मनोरंजन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांतील 10 स्टार्टअप्स सहभागी झाले. कार्यक्रमानंतर मिळालेल्या अभिप्रायानुसार, स्टार्टअप्सनी 299 हून अधिक बैठका घेतल्या. सहा स्टार्टअप्समध्ये 14 व्यावसायिक करार झाले असून त्यात एका सामंजस्य कराराचाही समावेश आहे.
ज्ञान मालिकेत 25 परिसंवाद
21 ते 24 नोव्हेंबरदरम्यान आयोजित चार दिवसीय ज्ञान मालिकेत 25 परिसंवाद झाले. त्यात भारतासह विविध देशांतील सुमारे 127 वक्ते आणि 17 सूत्रसंचालक सहभागी झाले. नेटफ्लिक्स इंडिया, प्राइम व्हिडिओ आणि ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओज यांसारख्या संस्थांच्या प्रतिनिधींनीही सहभाग घेतला.
भारतीय कथांचे जागतिक बौद्धिक संपदेत रूपांतर, ओटीटी क्षेत्रातील बदल, स्वतंत्र चित्रपटसृष्टी, आंतरराष्ट्रीय सहनिर्मिती, चित्रपटांसाठी अर्थसहाय्य आणि प्रादेशिक चित्रपट उद्योग या विषयांवर चर्चा झाली. ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, एक्स्टेंडेड रिॲलिटी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील सर्जनशील कौशल्यांवरही सत्रे झाली.
तंत्रज्ञान मानवी सर्जनशीलतेची जागा घेऊ शकत नाही : गोवारीकर
कृत्रिम बुद्धिमत्ता हे चित्रपट निर्मात्यांसाठी सहाय्यक साधन ठरू शकते; मात्र ते मानवी अभिव्यक्तीची जागा घेऊ शकत नाही, असे आशुतोष गोवारीकर यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे चित्रपटातून अभिव्यक्तीच्या शक्यता विस्तारतील; मात्र आशयप्रधान चित्रपटांचे महत्त्व कमी होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
वेव्हज चित्रपट बाजारातून झालेल्या बैठका आणि चर्चांचे परिणाम पुढील एक ते चार वर्षांत दिसून येऊ शकतात, असे प्रभात यांनी सांगितले.
श्रीराग एम. यांनी स्वतंत्र भारतीय चित्रपटसृष्टीला या उपक्रमातून मिळणाऱ्या पाठबळाकडे लक्ष वेधले. ‘आट्टम’, ‘बूम’ आणि ‘अंग’ यांसारख्या चित्रपटांना बाजारातून सहाय्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन सय्यद रबीहाश्मी यांनी केले.
Comments are closed.