इंग्लंडमध्ये दुर्लक्ष झाल्याने अभिमन्यू ईश्वरन फोनवरच झाला भावुक! कोच गंभीर यांनी दिलं वचन

2022 पासून अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) फक्त वाट पाहणं आणि वाट पाहणंच सुरू आहे. कसोटी टीममध्ये नाव असतं, पण गेली तीन वर्षं हा खेळाडू परदेशी भूमीवर जाऊन फक्त पाणीच पाजत आहे. हा दुर्दैवी फलंदाज म्हणजे अभिमन्यू ईश्वरन. तोच अभिमन्यू जो इंग्लंड दौऱ्यावर टेस्ट डेब्यूचं स्वप्न घेऊन गेला होता. पण पुन्हा एकदा तीच कथा अभिमन्यूला बेंचवरच बसावं लागलं. सुरुवातीच्या चार टेस्टमध्ये संधी मिळालीच नाही.

पण ओव्हल कसोटी सामन्याच्या आधी काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यावर एक आशा निर्माण झाली होती की, आता अभिमन्यूचा दीर्घ प्रतिक्षेचा अंत होईल. पण पुन्हा एकदा स्वप्न अपूर्णच राहिलं. ओव्हल कसोटी सामन्यात दुर्लक्ष झाल्यानंतर अभिमन्यू खूपच खचला. त्याने वडिलांना फोन केला आणि बोलताना भावुक झाला. ही गोष्ट स्वतः अभिमन्यूच्या वडिलांनी उघड केली आहे.

एका युट्यूब चॅनेलवर बोलताना अभिमन्यूच्या वडिलांनी सांगितलं, माझा मुलगा आता बेंगळुरूला जाणार आहे आणि तिथे जाऊन दुलीप ट्रॉफीची (Dulip Trophy 2025) तयारी करणार आहे. तिथे तो 10-12 दिवस राहील आणि मग काही दिवस देहरादूनला परत येईल. पाचव्या कसोटी सामन्यात संधी न मिळाल्यामुळे तो खूप निराश झाला होता. त्याला वाटलं होतं की, ओव्हल टेस्टमध्ये त्याला नक्कीच खेळवलं जाईल. मी त्याला सांगितलं की तू तुझं स्वप्न जगला आहेस. यावर अभिमन्यू म्हणाला, ‘मी समजतो, मी 23 वर्षं माझ्या स्वप्नासाठी जगलो आहे आणि एक-दोन सामन्यांत संधी न मिळाल्यामुळे मी तुटून जाणार नाही. पण तो खूप खचला होता, कारण त्याला संधी मिळालीच नव्हता. मी त्याला फोन केला तेव्हा त्याने म्हटलं, ‘प्पा, मला अजूनही संधी मिळाली नाही.

अभिमन्यूच्या वडिलांनी सांगितलं की, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी वचन दिलं आहे की त्याला पुरेशी संधी मिळेल. त्यांनी सांगितलं, गौतम गंभीरने माझ्या मुलाशी बोलून त्याला विश्वास दिला आणि म्हटलं की तू अगदी बरोबर गोष्ट करतो आहेस. तुझी वेळ लवकरच येईल आणि तुला योग्य तेवढे चान्स दिले जातील. एक-दोन सामन्यांनंतर तुला टीमबाहेर टाकणार नाही. माझ्या मुलाने गंभीरसोबतच्या बोलण्यातलं सगळं मला सांगितलं. संपूर्ण कोचिंग स्टाफने त्याला विश्वास दिला आहे की त्याला संधी मिळेल. माझा मुलगा गेली चार वर्षं प्रतिक्षा करतोय. त्याने 23 वर्षं खूप मेहनत केली आहे.

Comments are closed.