आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्याचा जपानमध्ये अपघाती मृत्यू
हिंदुस्थानातील आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्याचा जपानमधील हिरोशिमा प्रांतात अपघाती मृत्यू झाला. श्याम संतोष अग्रवाल असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. श्याम हा आर्किटेक्चर अँड रिजनल प्लॅनिंग विभागातील मास्टर ऑफ आर्किटेक्चरचा विद्यार्थी होता. मे ते डिसेंबर 2026 या कालावधीत तो हिरोशिमा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपसाठी जपानमध्ये गेला होता.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आयआयटी खरगपूरचा पदव्युत्तर विद्यार्थी असलेल्या श्यामचा रविवारी जपानमधील हिरोशिमा प्रांतातील कुरे शहरात अपघात झाला. अपघातानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आयआयटी खरगपूरचे संचालक सुमन चक्रवर्ती यांनी श्यामच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. आम्ही दूतावासाशी संपर्क साधला असून त्याच्या कुटुंबीयांनाही माहिती दिली आहे. त्याचा मृतदेह परत आणण्यासाठी आयआयटी खरगपूर सर्व आवश्यक व्यवस्था करत आहे, असे चक्रवर्ती यांनी सांगितले.
Comments are closed.