भुयारी मेट्रो स्थानकांना बेकायदा पार्किंगचा वेढा! वाहतूक पोलिसांचा ‘नो पार्किंग झोन’चा निर्णय आठवडय़ानंतरही कागदावरच
चर्चगेट स्थानकाच्या आवारात पार्किंगला मनाई असल्याचा फलक अद्याप लावलेला नाही. तसेच मेट्रोच्या सुरक्षा रक्षकांकडून देखरेख ठेवली जात नाही. त्यामुळे मेट्रोच्या गेटभोवती बेकायदा पार्किंगचा वेढा आहे. या गाडय़ांमध्ये आमदार तसेच ‘महाराष्ट्र शासन’ लिहिलेल्या गाडय़ांचा समावेश असतो. पार्किंग रोखण्यासंबंधी कोणती पावले उचलली आहेत, याबाबत बुधवारी मुंबई मेट्रो प्रशासनाला विचारणा केली. त्यावर मेट्रो प्रशासनाने उशिरापर्यंत उत्तर दिले नाही.
मेट्रो-3 या भुयारी मेट्रो मार्गिकेवरील स्थानकांना बेकायदा पार्किंगचा वेढा ‘जैसे थे’ आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी भुयारी मेट्रोच्या 27 स्थानकांच्या प्रवेशद्वारांपासून 30 मीटरचा परिसर ‘नो पार्किंग झोन’ जाहीर केला आहे. त्याला आठवडा उलटल्यानंतरही ‘नो पार्किंग झोन’ची अंमलबजावणी कागदावरच आहे. चर्चगेटसारख्या प्रमुख स्टेशन परिसरात बेकायदा पार्किंग होत असून त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
आरे जेव्हीएलआर ते कफ परेडदरम्यान भुयारी मेट्रोची सेवा सुरू आहे. या मार्गिकेवर प्रवाशांची संख्या वाढत असताना सुरक्षेच्या मुद्दय़ाकडे मेट्रो प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे वेळोवेळी उघडकीस आले. मेट्रो स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर सुरक्षेची पुरेशी खबरदारी न घेणे तसेच बेकायदा पार्किंगचा उपद्रव रोखणे अशा विविध बाबतीत मेट्रो प्रशासनाची उदासीनता समोर आली. यादरम्यान आठवडाभरापूर्वी वाहतूक पोलिसांनी 27 मेट्रो स्थानकांच्या एन्ट्री आणि एक्झिट गेटपासून 30 मीटरचा परिसर ‘नो पार्किंग झोन’ जाहीर केला. प्रवाशी सुरक्षा आणि गेटच्या मार्गातील वाहनांचा अडसर दूर करण्याच्या हेतूने पोलिसांनी ‘नो पार्किंग झोन’ची घोषणा केली. पण अंमलबजावणी सुरू केलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी जारी केलेल्या आदेशाबाबत मेट्रो प्रशासन गंभीर नसल्याने प्रवाशी सुरक्षा रामभरोसे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.