शुभ संकेत! ब्रिटनमध्ये कॅन्सरवरील लसीवर महत्त्वपूर्ण संशोधन; 20 वर्षे आधीच कॅन्सरच्या पेशींना संपवणार
कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराने जगभरात लाखो मृत्यू होतात. 2023 च्या आकडेवारीनुसार जगात कॅन्सरने 96 लाख ते एक करोड लोकांचा मृत्यू झालेला आहे. यातून या आजाराची गंभीरता दिसून येते. सध्याच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील क्रांती आणि लोकांमधील जागरूकतेमुळे कॅन्सरचे निदान आणि उपचार सोपे झाले आहेत. मात्र आजही कॅन्सरचे नाव घेताच भीती वाटते.
अशा सगळय़ा चिंताजनक परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रात एक दिलासा देणारी घटना घडली आहे. ब्रिटनचे शास्त्रज्ञ कॅन्सरवरील लसीवर संशोधन करत आहेत. शास्त्रज्ञ अशी लस तयार करत आहेत, जी लस शरीरात कॅन्सर विकसित होण्याच्या कित्येक वर्षे आधी (साधारण 20 वर्षे) कॅन्सर पेशींना रोखू शकते. कॅन्सरवरील नवीन लस लवकरच येण्याचे संकेत आहेत. युनिर्व्हसिटी ऑफ ऑक्सफर्डचे शास्त्रज्ञ आणि ‘जीएसके’ ही फार्म्यास्युटिकल पंपनी एकत्र येऊन कॅन्सर लसीवर काम करत आहे. लसीमुळे शरीरातील अज्ञात कॅन्सर पेशींचा शोध घेता येईल.
प्राध्यापक सारा ब्लागडेन म्हणाल्या, आपल्याला असं वाटतं की शरीरात कॅन्सरच्या पेशींची वाढ होण्यासाठी एक ते दोन वर्षे लागतात, पण तसे नाही. अनेक अभ्यासातून असं दिसून आलंय की कॅन्सरच्या पेशी विकसित होण्यासाठी 20 वर्षे लागू शकतात. कधी कधी त्याहून जास्त… एका सामान्य पेशीला कॅन्सर पेशी बनवण्यासाठी खूप काळ लागू शकतो.
प्री कॅन्सर स्टेजमध्ये कॅन्सरचा शोध घेऊन त्याला संपवणे हा संशोधनाचा विषय असल्याचे प्रा. सारा ब्लागडेन यांनी सांगितले. ‘जीएसके – ऑक्सफर्ड कॅन्सर इम्युनो प्रिवेन्शन प्रोग्रॅम’ला अनेक तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगतीच्या आधारे लाँच करण्यात आलंय. त्यातून प्री कॅन्सर व्हॅक्सिनची आशा निर्माण झालेय.
कॅन्सरच्या दिशेने वाढणाऱ्या पेशींची वैशिष्टय़े काय आहेत याचा शोध घेण्यात यश आलंय. त्याच दिशेने आता व्हॅक्सिन तयार करण्याचा प्रयत्न होतोय़ कॅन्सरच्या पेशी शरीरात विकसित होण्याआधी 20 वर्षे आधी रोखता येतील, असे प्रा. सारा ब्लागडेन म्हणाल्या.
Comments are closed.