पुणे मेट्रो बाबत महत्वाचे अपडेट…. स्वारगेट-कात्रज मेट्रो प्रकल्पासाठी आणखी काही वर्षे वाट पाहावी लागणार पुणे मेट्रोसंदर्भातील महत्त्वाची अपडेट…. स्वारगेटसाठी अजून काही वर्षे वाट पहावी लागेल का?

पुणे मेट्रो न्यूज : पुणेकरांसाठी एक महत्त्वाचं अपडेट येत आहे, ते पुणे मेट्रोसंदर्भातलं अपडेट. पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे मेट्रोही सुरू करण्यात आली असून मेट्रोला पुणेकरांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुण्यात सध्या दोन मेट्रो मार्गिका आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गावर सध्या मेट्रो धावत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पिंपरी चिंचवड पालिका ते स्वारगेट या रस्त्याचेही विस्तारीकरण करण्यात येणार आहे.
हा मार्ग थेट कात्रजपर्यंत नेण्यात येणार आहे. म्हणजेच स्वारगेट ते कात्रज असा नवा मेट्रो मार्ग विकसित केला जाणार असून आता या प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गाचे प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार आहे.
या प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) द्वारे ITD सिमेंटेशन इंडिया लिमिटेडची निवड करण्यात आली असून त्याला अधिकृतपणे कार्यादेश जारी करण्यात आला आहे.
गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला गती मिळणार आहे. पुण्यात मध्यवर्ती शहरापासून दक्षिण भागात जाणाऱ्या मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्येवर उपाय म्हणून स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता.
5.46 किमी लांबीच्या या महत्त्वाच्या मेट्रो मार्गाचा भूमिपूजन समारंभ 29 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. मात्र, तांत्रिक कारणे, रस्त्यातील अडथळे आणि स्थानिकांच्या मागण्यांमुळे कामाची प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत होती.
स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार बिबवेवाडी आणि बालाजीनगर ही दोन अतिरिक्त स्थानके या मार्गावर जोडण्यात आली आहेत. आता निवडणूक आचारसंहिता लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या कामाला अधिकृत हिरवा कंदील मिळाला आहे.
या कामाच्या अंमलबजावणीसाठी महामेट्रो आणि कंत्राटदार कंपनी यांच्यात झालेल्या करारानुसार हा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे महामेट्रोचे जनसंपर्क संचालक चंद्रशेखर तांबवेकर यांनी सांगितले.
या प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारकडून यापूर्वीच मंजुरी मिळाली असल्याने, येत्या आठवड्यात भूमिगत बोगदा खोदणे आणि स्टेशन बांधणीचे प्राथमिक टप्पे सुरू होण्याची शक्यता आहे.
कात्रज, बिबवेवाडी, धनकवडी, सहकारनगर, गुलटेकडी, मार्केट यार्ड तसेच पुण्याबाहेरून स्वारगेटला येणाऱ्या कोल्हापूर, सातारा, सांगली येथील प्रवाशांसाठी हा मार्ग अतिशय सोयीचा ठरणार आहे. या मार्गावरील मार्केटयार्ड, पद्मावती, बिबवेवाडी, बालाजीनगर आणि कात्रज या एकूण पाच स्थानकांचा समावेश आहे.
या प्रकल्पाची एकूण किंमत 3,780 कोटी रुपये असून, हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतुकीचा ताण बऱ्याच अंशी कमी होणार आहे. तसेच पिंपरी, शिवाजीनगर, रामवाडी हा प्रवास इतर मेट्रो मार्गांशी जोडल्यामुळे जलद होणार आहे.
Comments are closed.