पाकिस्तानाच्या तुरुंगातच इम्रान खान यांचा मृत्यू? पत्रकाराच्या दाव्याने एकच खळबळ

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI)चे संस्थापक इम्रान खान यांच्या तुरुंगातील कथित मृत्यूच्या चर्चेने पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी पत्रकार वजाहत सईद खान यांनी केलेल्या एका दाव्यानंतर इम्रान खान यांच्या प्रकृती आणि सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, इम्रान खान यांच्या मृत्यूच्या माहितीला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाहिये.

पाकिस्तानी पत्रकार वजाहत सईद खान यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर दावा केला की, तीन वरिष्ठ लष्करी सूत्रांनी त्यांना इम्रान खान आता जिवंत नसण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. मात्र, या सूत्रांनी स्वतः इम्रान खान यांना मृत पाहिलेले नाही.

इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढण्यामागे त्यांचे कुटुंबीय, पक्षाचे नेते, वकील आणि खासगी डॉक्टरांना त्यांची भेट घेण्यासंदर्भातील सातत्याने सुरू असलेले वादही कारणीभूत आहेत. पक्षाने यापूर्वीही इम्रान खान यांना एकाकी ठेवले जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या उपचारांबाबतही पक्षाकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

जून महिन्यात पक्षाने इम्रान खान यांना रुग्णालयात दाखल करण्याची, त्यांच्या नियमित भेटीची परवानगी देण्याची आणि खासगी डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्याची मागणी केली होती.

मे महिन्यातही इम्रान खान यांच्या बहिणींना तसेच खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल अफरीदी यांना अदियाला तुरुंगात जाण्यापासून रोखण्यात आले होते. या घटनेविरोधात पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने आंदोलनही केले होते.

इम्रान खान यांच्या स्थितीबाबत वाढत असलेली चिंता आता राजकीय संघर्षाचे रूप घेत आहे. पक्षाचे नेते आणि खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल अफरीदी यांनी पक्षाचे 20 लाखांहून अधिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचा दावा केला आहे.

पक्षाने 27 सप्टेंबर रोजी इस्लामाबादपर्यंत लाँग मार्च काढण्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबतच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

इम्रान खान ऑगस्ट 2023पासून तुरुंगात असून, त्यांच्यावर अनेक प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्या अटकेनंतर लष्करी आस्थापनेसोबतचा त्यांचा संघर्ष हा पाकिस्तानच्या राजकारणातील प्रमुख मुद्दा राहिला आहे.

Comments are closed.