इम्रान खान डोळ्याच्या आजाराने ग्रस्त, वेळीच उपचापर न केल्यास होईल गंभीर परिणाम
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या आडियाला कारागृहात शिक्षा भोगत असून त्यांच्या प्रकृतीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार, इम्रान खान यांची दृष्टी केवळ 15 टक्के शिल्लक राहिली असून, त्यांना तातडीने उपचारांची गरज आहे. जर त्यांच्यावर वेळेत उपचार झाले नाहीत, तर ते दोन्ही डोळ्यांची दृष्टी पूर्णपणे गमावण्याची भीती अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2025 पर्यंत त्यांची प्रकृती स्थिर होती, मात्र त्यानंतर अचानक त्यांच्या उजव्या डोळ्यातील दृष्टी कमी झाल्याचे वरिष्ठ वकील सलमान सफदर यांनी न्यायालयाला सांगितले.
बीबीसी उर्दूने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून 16 फेब्रुवारीपूर्वी देशातील नामवंत डॉक्टरांचे एक पथक पाठवून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. इम्रान खान यांच्या उजव्या डोळ्यामध्ये ‘सेंट्रल रेटिनल व्हेन ऑक्लुजन’ नावाचा आजार विकसित झाला असून, यामुळे डोळ्याच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन गंभीर अडथळा निर्माण झाला आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाने त्यांच्या नेत्याच्या प्रकृतीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, इम्रान खान यांना त्यांच्या मुलांशी फोनवरून बोलण्याची परवानगी देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले असून, सरकारी वकिलांनी याला संमती दर्शवली आहे. इम्रान खान मे 2023 पासून भ्रष्टाचार आणि इतर आरोपांखाली तुरुंगात आहेत.
Comments are closed.